आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला व्यासपीठावर बसणारी व्यक्ती कोणत्याही आरोपाची धनी नसावी, अशी सर्वसाधारण अपेक्षा. मात्र, आरोपच नव्हे, तर गंभीर आरोपाचे धनी असलेले माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना नेमके कोणत्या निकषांच्या आधारावर अध्यक्षपदाचे सिंहासन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाच्या विभागीय केंद्राने बहाल केले, हे न उलगडणारे कोडे ठरले आहे.
प्रतिष्ठानकडून या कृतीची अपेक्षा नसल्याने पत्रिकेवरील ढोबळेंचे नाव बघून अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने दिवं. यशवंतराव चव्हाण यांच्या ३० व्या पुण्यतिथीदिनानिमित्त ‘यशवंतराव चव्हाण यांची साहित्यिक व सामाजिक दृष्टी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. बृहन्मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त धनराज वंजारी या विषयावर भाष्य करणार आहेत.
मात्र, एवढय़ा मोठय़ा कार्यक्रमाला महिलेवरील अत्याचाराच्या आरोपाचे धनी असलेल्या लक्ष्मण ढोबळेंना थेट अध्यक्षपदी बसविण्याचे गमक मात्र उलगडले नाही. ढोबळेंच्या बौद्धिक व वक्तृत्त्व क्षमतेविषयी दुमत नाही. मात्र, त्यांच्यावरील आरोपातूनही ते पूर्णपणे सुटलेले नाहीत. माजी पाणीपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते ढोबळे यांची एकूणच कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे. ढोबळे यांनी अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्याच शिक्षण संस्थेतील एका महिलेने केला आहे.
या तक्रारीवरून बोरिवली पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर अटकपूर्ण जामीन त्यांनी मिळवला असला तरी आरोपातून ते अजूनही सुटलेले नाहीत. या आरोपामुळे त्यांच्याच पक्षाने त्यांना उमेदवारीही नाकारली होती. तरीही त्यांनी सोलापूर जिल्’ाातील मोहोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.
ढोबळेंना केवळ सात हजार मते मिळाली. बंडखोरी करूनही राष्ट्रवादीने त्यांना अजून पक्षातून काढले नाही. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून तर त्यांना या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात बोलावले नाही ना, अशी शंका आता घेतली जात आहे. ढोबळेंवरील आरोप अतिशय गंभीर आहेत. असे असताना प्रतिष्ठानला त्यांचा एवढा पुळका का यावा, हे कळायला मार्ग नाही.
आयोजकांमध्ये वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, किशोर कन्हेरे, रमेश बोरकुटे, संजय कोंडावार, डॉ. अक्षयकुमार काळे, विजय जिचकार, प्रा. ज्ञानेश वाकूडकर, डॉ. मोईज हक, डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. कोमल ठाकरे, डॉ. सुनील रामटेके, मनिषा साधू, माधवी पांडे यासारखी प्रतिष्ठीत नावे आहेत. मात्र, यापैकी एकालाही या नावावर आक्षेप घ्यावासा वाटू नये, हे आश्चर्यकारकच आहे.
या संदर्भात मनिषा साधू यांच्याशी संपर्क साधला असता कार्यक्रमाची पत्रिका मी अजून पाहिलेली नाही. त्यामुळे ही नावे कु णी ठरवली हे माहिती नाही, असे उत्तर त्यांनी दिले.

Story img Loader