संतप्त व्यापाऱ्यांचा ‘रेल रोको’
स्थानिक संस्था कराच्या विरोधात व्यापारी आक्रमक झाले असून त्यांनी बुधवारी सकाळी अचानक शालिमार एक्सप्रेस रोखून धरल्याने रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. दुपारी एक वाजताच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनन्स शालिमार एक्सप्रेस मोतीबाग रेल्वे पुलाजवळ आली. ती अगदी हळूहळू पुढे जात असताना अचानक रेल्वे रुळावर चार-पाचशे व्यापाऱ्यांचा जत्था आला. त्यामुळे चालकाने गाडी थांबविली. व्यापाऱ्यांनी ‘एलबीटी हटाव’च्या घोषणा देत रुळावर ठाण मांडले. ते पाहण्यासाठी मोतीबाग परिसरातून रस्त्याने जाणारे वाहन चालक रस्त्यावर थांबल्याने तेथील वाहतूक खोळंबली होती. गाडीच्या चालकाने तातडीने रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला ही घटना कळविली. अचानकच झालेल्या या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तेथे बऱ्याच वेळाने पोहोचले. पोलीस जवळ आलेले पाहताच आंदोलक तेथून पळून गेले.
दरम्यान, कोतवाली पोलिसांनी सहा व्यापाऱ्यांना पकडल्याच्या निषेधार्थ व्यापारी तसेच भाजपच्या व्यापारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. शेकडो व्यापारी इतवारीमधून बंदचे आवाहन करीत पायीच कोतवाली पोलीस ठाण्याकडे निघाले. महालमध्ये केळीबाग मार्गावरील दुकानदार त्यात सहभागी झाले होते. मनोहरलाल आहुजा, मेघराज मैनानी, संजय वाधवानी, अशोक शनिवारे, रवि अग्रवाल, मनोज सोनी, आसिफभाई कलीवाला, भूपेंद्र चेलानी, सुरेश नागदेवे, प्रकाश छाबरिया, श्याम बजाज, राधेश्याम सारडा, मोतीलाल चुनियानी, शंकर कृपलानी, भरत मदान, नितीन खेतान, दिनेश सारडा, गोपाल भाटिया, प्रदीप पंजवानी आदींनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन अटक केलेल्या सहा व्यापाऱ्यांची मुक्तता करण्याची मागणी केली.
इतवारी, गांधीबाग, मस्कासाथ परिसरातील सराफा, धान्य, किराणासह सर्वच दुकाने बंद होती. शहराच्या अनेक भागातील दुकाने आजही बंदच होती. मात्र, मेडिकल चौक, रामेश्वरीसह काही भागात दुकाने सुरू होती. वर्धमाननगरातील बिग बाजारची शटर्स बंद असली तरी एक दार उघडे ठेवून ग्राहकांना आत पठविले जात असल्याचे दिसल्याने व्यापाऱ्यांचा एक गट तेथे पोहोचले.
तेथे किरकोळ शाब्दिक वाद झाला. ऑल स्क्रॅप र्मचट असोसिएशन व्यापाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाली. राजू नायडू, मुन्नुलाल शाहू, राहुल मेश्राम यांच्यासह सर्व पदाधिकारी व दुकानदार आंदोलनात सहभागी झाले. सीताबर्डीवरील इलेक्ट्रॉनिक्स दुकानदारही आंदोलनात आहेत.

Story img Loader