ठाणे महापालिकेस स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून वार्षिक उत्पन्न मिळू शकते, या संबंधीचा सविस्तर लेखाजोखा असलेला अहवाल ठाण्यातील व्यापाऱ्यांनी तयार केला असून त्यातून महापालिकेस जकातीपेक्षा दुप्पट उत्पन्न मिळू शकते, असे स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार, स्थानिक संस्था कराप्रमाणेच महापालिकेला जकातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मात्र, ते निम्मेच मिळत असल्याने महापालिकेतील जकात चोरी आता चव्हाटय़ावर आहे. तसेच स्थानिक संस्था करातून दुप्पट उत्पन्न मिळणार असल्याने महापालिकेने त्याच्या दरात सुमारे दोन टक्क्य़ांनी कपात करावी, जेणेकरून ठाणेकरांनाही काहीसा दिलासा मिळेल, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. तसेच त्यांचे शिष्टमंडळ येत्या दोन दिवसांत महापालिकेचे नवे आयुक्त आसीमकुमार गुप्ता यांच्यासोबत चर्चा करणार आहे.
ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांतील लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्र, या सर्वाचा विचार करून ठाण्यातील व्यापाऱ्यांनी तुलनात्मक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये नवी मुंबई महापालिकेस उपकराच्या माध्यमातून आणि महापालिकेस स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून कितपत वार्षिक उत्पन्न मिळू शकते, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. नवी मुंबईची लोकसंख्या १२ लाख तर ठाणे शहराची १८ लाखांच्या घरात आहे. नवी मुंबई महापालिकेस उपकराच्या माध्यमातून एक टक्क्य़ानुसार १७० कोटी रुपये उत्पन्न मिळते, त्यामध्ये एपीएमसीमधून २० कोटी रुपये उत्पन्नाचा समावेश आहे. ठाणे शहराची लोकसंख्या नवी मुंबईपेक्षा दीड टक्क्य़ाहून अधिक आहे. त्यामुळे महापालिकेस २२५ कोटी रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. नवी मुंबई महापालिकेस उपकराच्या चार टक्के दरानुसार, ६०० कोटी रुपये तर ठाणे महापालिकेला स्थानिक संस्था कराच्या चार टक्क्यांनुसार ९०० कोटी रुपये मिळू शकतात. नवी मुंबई शहरामध्ये मोठय़ा प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असून सुमारे सहा हजार कंपन्या आहेत. त्यामुळे महापालिकेला उपकराच्या एक टक्क्य़ानुसार २५० कोटी रुपये मिळू शकतात. आशिया खंडातील सर्वाधिक मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून ठाणे शहराची ओळख होती. मात्र, आता तेथील बहुतेक कंपन्या बंद पडल्याने हे क्षेत्र आता कमी झाले असून ते नवी मुंबईच्या तुलनेत २० टक्क्य़ाने कमी आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेस स्थानिक संस्था कराच्या चार टक्क्यांनुसार औद्योगिक क्षेत्रातून दोनशे कोटी रुपये मिळू शकतात. या सर्वाचा विचार करता, एकूणच ठाणे महापालिकेस स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून वर्षांकाठी ११०० कोटी रुपये मिळू शकते. जकातीपोटी महापालिकेला इतकेच उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मात्र, जकातीपोटी वर्षांकाठी सुमारे साडेचार ते पाच कोटी रुपयेच उत्पन्न मिळत होते. त्यामुळे महापालिकेतील जकात चोरी आता चव्हाटय़ावर आली आहे.
लवकरच आयुक्तांसोबत बैठक
ठाणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते हनुमंत जगदाळे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील व्यापाऱ्यांची गुरुवारी महापालिकेत बैठक घेण्यात आली. त्या वेळी स्थानिक संस्था कर विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत व्यापाऱ्यांनी ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेला मिळणाऱ्या कराच्या आर्थिक उत्पन्नाचा तुलनात्मक अहवाल मांडला. तसेच या अहवालानुसार, जकातीपेक्षा स्थानिक संस्था करातून दुप्पट उत्पन्न मिळणार असल्याने त्यातील दरात सुमारे दोन टक्क्य़ांनी कपात करावी, अशी मागणी केली. दरम्यान, नवे आयुक्त आसीम गुप्ता यांच्यासोबत येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन त्यावर लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन जगदाळे यांनी व्यापाऱ्यांना दिले.