शिसे या घातक पदार्थाच्या विषबाधेमुळे गर्भातील बालकांपासून ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांना विविध आजार होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिसे वापरावर कायमची बंदी घालावी, या मागणीसाठी शासन आणि शिसेचा वापर करणाऱ्या उद्योगांवर समाजातील विविध संस्था व व्यक्तींनी दडपण आणावे, अशी अपेक्षा लता मेडिकल संशोधन संस्थेच्या प्रकल्प संचालिका डॉ. अर्चना पटेल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
शिसे हा घातक पदार्थ भिंतीला लावणारे पेंट, घरगुती रंग, रंगकांडय़ा, रंगीत पेन्सील, होळीचे रंग, चिनी मातीच्या बरण्या, यामध्ये वापरला जातो. याबरोबरच मातीतही शिसे असते. त्यामुळे या वस्तूंच्या सानीध्यात आल्यास त्याची विषबाधा होते. ही विषबाधा झाली की या मुलांमध्ये डोकेदुखी, चिडचिडेपणा, पोटदुखी, थकवा येणे, मळमळ होणे, रक्तक्षय, पॅरालिसीस, कमी ऐकायला येणे, एकाग्रता नसणे ही लक्षणे आढळून येतात. एवढेच नव्हे तर ज्या मुलांच्या रक्तात शिसाच्या विषाचे प्रमाण अधिक असते अशा मुलांचा बुद्धय़ांक कमी असतो. तसेच काही मुले गुन्हेगारीकडेही वळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लता मेडिकल संशोधन संस्थेने शहरातील शंभर मुलांवर हे संशोधन केले. त्यातील ६० टक्के मुलांमध्ये वरीलप्रमाणे लक्षणे आढळून आली. या मुलांच्या रक्तनमुन्यात १० मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक शिसे असल्याचे आढळून आल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.
अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील काही देशांनी शिशावर कायमची बंदी घातली आहे. पेट्रोलमध्येही शिसे वापरण्यास बंदी आहे. भारतातही पेट्रोलमध्ये शिसे वापरण्यास बंदी घातली असली तरी अन्य वस्तूत शिसे आजही सर्रास वापरली जाते. संस्थेने केलेल्या विनंतीवरून भारतातील पेंट निर्माण करणाऱ्या तीन कंपन्यांनी पेंटमध्ये शिसे वापरण्याचे प्रमाण कमी केले आहे. कारखाने असलेल्या भागातील मुलांमध्ये शिशाचे प्रमाण अधिक आढळून येते. कारण धुराच्या माध्यमातून शिसे वातावरणात पसरते. दूषित वातावरणातून अन्नामध्ये आणि अन्नातून पोटामध्ये शिसे जाते. त्यामुळे गर्भात असलेल्या बाळालाही विषबाधा होत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. आरोग्य खात्याने व सामाजिक संघटनांनी शिशापासून होणाऱ्या विषबाधेबाबत जनजागृती करावी. आरोग्य खात्याने मुलांच्या रक्ताची तपासणी करावी. बाळरोगतज्ज्ञ व शाळेतील शिक्षकांनी शिसेच्या दुष्परिणामांची माहिती द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला रोटरी क्लबच्या अमित शर्मा, शालीनी नायडू उपस्थित होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा