सांगली येथे नूतन बुद्धिबळ मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या खुल्या महिला मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरची फिडेमास्टर ऋचा पुजारी, माधुरी पाटील, औरंगाबदची ऋतुजा बक्षी, गौरी करमरकर, सुप्रिया जोशी यांनी आपली आघाडी कायम राखली. ग्रिष्मा अर्शरने धनश्री पंडितला तर नमिता जोशीने बँक ऑफ इंडियाच्या पुष्पलता मंगलला बरोबरीत रोखून अध्र्या गुणासह आघाडी घेतली.    
मीनाताई शिरगांवकर स्मृती आंतरराष्ट्रीय खुला महिला मानांकन बुद्धिबळ स्पर्धा बापट बाल शिक्षण मंदिर येथे सुरू आहेत. पाचव्या फेरीत कोल्हापूरची माधुरी पाटील व कोल्हापूरची फिडेमास्टर ऋचा पुजारी यांच्यातील डावाची सुरुवात राणीच्या प्यादाने झाली. डावाच्या सुरुवातीपासून सावध चाली रचणाऱ्या माधुरीने रचलेल्या चालींना ऋचाने जशास तसे प्रत्युत्तर देऊन डावावर समान वर्चस्व राखले. डावाच्या मध्यात माधुरीने राजाला दिलेला शह ऋचाने परतावून लावत माधुरीच्या राजाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. अखेर ४३व्या चालीला ऋचाने माधुरीला डाव सोडावयास लावला.     
सुप्रिया जोशी व शुभदा सावंत या मुंबईच्या खेळाडूंची डावाची सुरुवात राजाच्या प्याद्याने झाली. डावाच्या सुरुवातीला दोघींनी राजाकडील बाजू मजबूत करून चाली रचल्या. डावाच्या अखेरीस सुप्रियाने हत्तीच्या साहाय्याने शह देऊन ४५व्या चालीला पराभव केला.     
मुंबईच्या ग्रिष्मा अर्शर व औरंगाबादची ऋतुजा बक्षी यांच्यातील डाव २७व्या चालीला बरोबरीत सोडविला गेला. मुंबईच्या धनश्री पंडितने गुजरातच्या कविशा शहा हिला २९व्या चालीत पराभूत केले. पुण्याच्या सलोनी सापळेने मुंबईच्या आशना माखिजाला २१व्या चालीत बरोबरीत रोखले.     
पाचव्या फेरीअखेर फिडेमास्टर ऋचा पुजारी ५ गुणांसह प्रथम स्थानावर तर धनश्री पंडित, सुप्रिया जोशी साडेचार गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. तर १४ खेळाडू चार गुणांसह संयुक्त तिसऱ्या स्थानावर आहेत.

Story img Loader