डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ नेते व सातारा येथील स्वातंत्र्यसैनिक साथी अनंतराव विश्वनाथ शिकारखाने (वय ८५) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कोणताही धार्मिक विधी न करता देहदान व नेत्रदान करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी विजया, मुले सुरेश, सुनील, अनिल, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या महिन्यापासून अनंतराव शिकारखाने यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांना प्रकृतीने साथ दिली नाही. बुधवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये देहदान, नेत्रदान करण्यात आले. सामाजिक कार्याची सुरुवात अनंतराव शिकारखाने यांनी राष्ट्र सेवादलात सक्रिय होऊन केली. साथी एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, पीटर अल्वासिया, जॉर्ज फर्नाडिस, प्रा. ग. प्र. प्रधान, भाई वैद्य आदी समाजवादी चळवळीतील नेत्यांबरोबर त्यांनी काम केले. गोवा स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने गोव्यात सत्याग्रह केला. पोर्तुगीज शिपायांकडून त्यांचा मानसिक व शारीरिक छळही केला गेला.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी तुरूंगवासही भोगला. मोती चौकातील विजय वॉच कंपनी हे त्यांचे घडय़ाळाचे दुकान समाजवादी चळवळीचे केंद्र झाले होते. भारत संरक्षण अ‍ॅक्टखाली १९६७ साली त्यांना नाशिक कारागृहात एक महिना ठेवले होते.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार बी.आर.सावंत, नगरसेविका दीपाली गोडसे, नगरसेवक कल्याण राक्षे, हणमंतराव पवार, राजू गोडसे, किशोर पंडित, बापूसाहेब उथळे, कॉ. किरण माने, विजय मांडके, सी. पी. कुलकर्णी, किशोर बेडकिहाळ, शिरीष चिटणीस, गणपतराव साळुंखे, कॉ. वसंतराव नलावडे, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, डाव्या विचाराचे कार्यकर्ते व सातारकरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.       

Story img Loader