ठाणे परिसरात एकेकाळी संवेदनशील भाग कोणता, या प्रश्नाचे उत्तर मुंब्रा, राबोडी, कळवा असे ठरलेले असायचे. पोलीस आयुक्तालयातील अधिकाधिक कुमक मुंब््रयासह भिवंडी परिसरात बंदोबस्तासाठी खर्ची पडायची. या भागात कधी काय होईल याचा नेम नसायचा. त्यामुळे मुंब्रा-राबोडी आणि अधून-मधून कळव्यात पोलीस डोळ्यात तेल घालून पहारा करताना दिसायचे. ठाण्यातील राडेबाज नेत्यांनी मात्र संवेदनशील आणि असंवेदनशील विभागांचे हे गणित गेल्या काही महिन्यांपासून बदलून टाकले आहे. एरवी सुसंस्कृत ठाणेकरांची राजधानी म्हणून ओळखला जाणारा पाचपाखाडी परिसर पोलिसांच्या लेखी संवेदनशील म्हणून गणला जाऊ लागला असून मुख्यालय परिसरासाठी दंगा नियंत्रण वाहन राखीव ठेवण्याची वेळ नौपाडा पोलिसांवर आली आहे.
विशेष म्हणजे, हरिनिवास, गोखले मार्ग, महापालिका मुख्यालय परिसरात कधी कोणता राजकीय कार्यकर्ता रस्त्यावर येऊन राडा सुरू करेल याचा नेम नसल्याने महापालिका मुख्यालयात सुरू असलेल्या घडामोडींची खडान्खडा माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. महापालिकेतील अस्थिर राजकीय परिस्थिती लक्षात घेता पुढील अडीच वर्षे तरी कायमस्वरूपी दंगाविरोधी वाहन मिळावे, अशास्वरूपाचा प्रस्ताव नौपाडा पोलिसांनी पुढे केला असून ठाणे पोलीस आयुक्तालयातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या वृत्तास दुजोरा दिला आहे.  
ठाणे शहर सुसंस्कृत आणि सुशिक्षितांचे माहेरघर म्हणून काल-परवापर्यंत ओळखले जाई. पाचपाखाडी, घंटाळी, नौपाडा, जांभळी नाका हे परिसर तर सुशिक्षितांच्या नगरीचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जातात. तुलनेने मुंब्रा, कळवा परिसर पोलिसांच्या लेखी नेहमीच संवेदनशील राहिला. मुंब््रयात तर कधी काय होईल याचा नेम नसायचा. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकांमध्ये ठाणे आणि मुंब्रा हा फरकही ठळकपणे जाणवेल, असेच मतदान होताना वर्षांनुवर्षे पाहायला मिळाले.
रक्तरंजीत राजकारण ठाणे शहराला नवे नाही. चुरशीच्या अशा महापौर निवडणुकीदरम्यान एकेकाळी बेडय़ा ठोकून मतदानासाठी आणण्यात आलेला गण्या ठाणेकरांनी पाहिला आहे. तरीही पाचपाखाडी, नौपाडा हे परिसर ठाणे पोलिसांसाठी नेहमीच शांततेचे ठाणे ठरले. गेल्या काही वर्षांपासून मात्र हा संदर्भ बदलू लागला असून महापालिका मुख्यालय परिसरात राडेबाज नेते घालत असलेला धुमाकूळ पोलिसांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत ठाणे महापालिकेत आघाडी आणि युतीचे संख्याबळ टाकोटाक झाल्याने विद्वेषी राजकारणाला जोर चढला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात नगरसेवकांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याने संख्याबळाचे राजकारण दिवसेंदिवस प्रतिष्ठेचे ठरू लागले असून, यातूनच मुख्यालय परिसरात शक्तिप्रदर्शनाच्या नादात राडे होऊ लागल्याने नौपाडा पोलीस हा सर्व परिसर संवेदनशील जाहीर करण्याच्या बेतात आहेत. पाचपाखाडी परिसर मुंब््रयाप्रमाणे संवेदनशील जाहीर होणे हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया आतापासूनच सर्वसामान्य ठाणेकरांमधून व्यक्त होऊ लागली आहे. 

Story img Loader