लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांतील दरी स्थानिक पातळीवर अधिक रुंदावत चालल्याचे दिसत आहे. सिन्नर येथे आ. माणिक कोकाटे यांनी अखेर आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. मात्र मेळाव्यात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ आणि स्वीकारलेली भुजबळविरोधी भूमिका पाहता ही स्थिती खुद्द आ. कोकाटेंच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील काही वर्षांत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आलेल्या वेगवेगळ्या कटू अनुभवांची जंत्री काँग्रेसजनांनी मुख्यमंत्र्यांसमक्ष याच त्वेषात मांडली होती. परंतु वरिष्ठांकडून राष्ट्रवादीची पाठराखण केली जात असल्याने काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. ही बाब काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मतभेद ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर टोकाला जाण्यास कारक ठरली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्यासाठी प्रचार करायचा की नाही, या मुद्दय़ावरून काँग्रेसजनांमध्ये अनेक मतभेद आहेत. वरिष्ठ नेत्यांना आघाडीचा धर्म पाळणे महत्त्वाचे वाटत असले, तरी स्थानिकांची सल वेगळीच आहे. राजकारण कोळून प्यालेल्या भुजबळांना स्थानिक काँग्रेसजनांमधील अस्वस्थतेची पूर्णपणे कल्पना होती व आहे. त्यामुळे खास काँग्रेसचे नेते व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी संयुक्त मेळाव्याचे आयोजन करून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला होता. त्याद्वारे स्थानिक काँग्रेसजनांचा राग शांत करण्याचा प्रयत्न झाला. या मेळाव्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तेव्हादेखील भुजबळांविरोधातील हा असंतोष असाच उफाळून आल्याचे सांगितले जाते. अतिशय छोटय़ा-मोठय़ा बाबींमध्ये ढवळाढवळ करून राष्ट्रवादीने काँग्रेसला नेहमी सापत्नभावाची वागणूक दिली. यावेळी समस्त काँग्रेसजनांनी मुख्यमंत्र्यांसमोर राष्ट्रवादी आणि भुजबळ यांच्या सभोवतालच्या मंडळींकडून आलेल्या कटू अनुभवांचा पाढा वाचला.
विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची निवड करताना काँग्रेस व राष्ट्रवादीने समसमान नावे द्यावीत, असे निश्चित झाले होते. त्यानुसार काँग्रेसकडून नावे दिली गेली. परंतु ही यादी मंजुरीसाठी जाताना राष्ट्रवादीने काँग्रेसच्या अनेक नावांना कात्री लावली, अशी व्यथा काही पदाधिकाऱ्यांनी मांडली होती. आ. कोकाटे यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत भुजबळांकडून गतवेळप्रमाणे त्रास दिला जाऊ नये, अशी लेखी हमी घेण्याची मागणीच मुख्यमंत्र्यांकडे केली होती. काही जणांनी आदिवासी समितीतील सदस्यांच्या नावातही कसा घोळ घातला गेला, याची माहिती दिली. ही नावे परस्पर बदलली गेली. ही बाब लक्षात आल्यावर काँग्रेसच्या दोन आमदारांना आदिवासी विकासमंत्र्यांकडे धाव घेऊन ती पुन्हा बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागले. अशा एक ना अनेक व्यथा काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडल्या गेल्या. आ. कोकाटे यांच्या सिन्नर येथील मेळाव्यात त्याचेच प्रतिबिंब उमटले. कोकाटे समर्थकांनी भुजबळांसाठी प्रचार करण्यास नकार देऊन त्यांच्याविरोधात केलेली घोषणाबाजी हा दोन्ही पक्षांतील तीव्र झालेल्या मतभेदांचे निदर्शक आहे. काही काँग्रेसजन उघडपणे तर काही छुप्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या विरोधात काम करत असल्याने भुजबळांना विरोधी उमेदवारांशी दोन हात करण्याऐवजी मित्रपक्षातील हितशत्रूंशी लढण्यात शक्ती खर्च करावी लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा