पिंपरीत राष्ट्रवादीत ४ जागांसाठी ४५ नगरसेवकांचे अर्ज
‘लाखमोलाची’ समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीत प्रवेश मिळवून निवडणुकीत झालेला खर्च वसूल करण्यासाठी सर्वच पक्षातील नगरसेवकांची चढाओढ सुरू झाली आहे. सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसकडील ४ जागांसाठी तब्बल ४५ नगरसेवकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कोणाची निवड करायची, यावरून नेत्यांसमोर चांगलीच डोकेदुखी होणार आहे. स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या ८ जागांची नियुक्ती प्रक्रिया २० फेब्रुवारीला होणाऱ्या पालिका सभेत पार पडणार आहे. पालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार होणाऱ्या या नियुक्तयांमध्ये राष्ट्रवादीच्या ४ सदस्यांची वर्णी लागणार असून उर्वरित ४ जागा अन्य पक्षांसाठी राहणार आहेत. इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आल्यानंतर सर्वच पक्षात नगरसेवकांच्या उडय़ा पडल्या. राष्ट्रवादीतील इच्छुकांमध्ये माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, क्रीडा सभापती वनिता थोरात, विधी सभापती प्रसाद शेट्टी यांच्यासह यापूर्वी पद भोगलेले अनेक सदस्य असून नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा इच्छुकांमध्ये भरणा आहे. विशेष म्हणजे स्थायीत काम करण्यासाठी महिला सदस्य जास्त इच्छुक आहेत. काँग्रेसकडून भाऊसाहेब भोईर, कैलास कदम वगळता
८ नगरसेवक इच्छुक आहेत. त्यातील बहुतेक जण पहिल्यांदा निवडून आले आहेत. तर, शिवसेनेकडून गटनेते श्रीरंग बारणे, अश्विनी चिंचवडे वगळता अन्य सदस्य इच्छुक असल्याचे सांगण्यात आले.