काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी महापालिका निवडणुकीत किमान ४० जागांसह स्पष्ट बहुमत मिळवेल, असा दावा करताना आघाडीच्या नेत्यांनी मनपामध्ये शिवसेना-भाजप युतीने जातिधर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना भडकावून भ्रष्ट कारभार केल्याचा तसेच मनपामध्ये सत्ता असताना आघाडीने अनेक योजनांना मंजुरी मिळवली, त्यासाठी निधीही मिळवला. युतीने केवळ श्रेयासाठी त्याची उद्घाटने केली, मात्र या अनेक योजनांची कामे निकृष्ट दर्जाची झाली तसेच त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे अपूर्ण राहिल्याचा आरोपही आघाडीने केला आहे.
आघाडीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन सोमवारी राष्ट्रवादी भवनमध्ये करण्यात आले, त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना हा आरोप करण्यात आला. माजी आमदार दादा कळमकर यांनी आघाडीला ४० जागा मिळतील असा दावा केला. महापौर म्हणून आघाडी कोणा व्यक्तीला पुढे करणार नाही, ज्या पक्षाच्या अधिक जागा त्या पक्षाचा महापौर होईल, असे काँग्रेसचे प्रभारी आ. शरद रणपिसे व आ. अरुण जगताप यांनी स्पष्ट केले. आघाडी सत्तेवर आल्यास जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या पदाधिका-यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येईल, तसेच पाठपुराव्यासाठी या समितीच्या दर तीन महिन्यांनी बैठकाही होतील, असे आ. जगताप यांनी सांगितले.
गेल्या २५ वर्षांत व राज्यमंत्री असतानाही युतीच्या आमदाराने कधीही केंद्र व राज्य सरकारकडे विकास योजनांच्या निधीसाठी पाठपुरावा केला नाही, याकडे कळमकर यांनी लक्ष वेधले. फेज टू पाणी योजना, नगरोत्थानमधील रस्ते, पथदिवे, घरकुल, बाहय़वळण रस्ता, गंगा उद्यान आदी कामांचा पाठपुरावा व मंजुरी आघाडीच्या काळातच झाली, परंतु निधी मिळूनही ही कामे युतीला सत्ता मिळूनही पूर्ण करता आली नाहीत. यातील काही कामे तर निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप माजी महापौर संग्राम जगताप यांनी केला. बालिकाश्रम रस्ता, कोठी रस्ता, केडगाव देवी रस्ता या कामांची केवळ श्रेयासाठी उद्घाटने युतीने केली मात्र ही कामे अपूर्णच आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. रिलायन्स कंपनीच्या रस्ते खोदाईच्या कामात युतीने ४ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, त्याची तक्रार आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा यांनी सांगितले.
मनपाच्या माध्यमातून पंतप्रधान कौशल्यनिर्मितीचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवून रोजगारनिर्मितीचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसच्या संनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख यानी सांगितले. या वेळी माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, काँग्रेसचे अनंत देसाई, उबेद शेख, सविता मोरे, अभिजित लुणिया आदी उपस्थित होते.
दोघा आमदारांचे साडेसात कोटी
आघाडीच्या आमदारांना राज्य सरकारने दुष्काळामुळे १० कोटी रुपयांचा निधी दिला, त्यातून आपण शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी साडेपाच कोटी रुपये उपलब्ध केल्याची माहिती आ. अरुण जगताप यांनी दिली. तर विधान परिषदेचे संगमनेरचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी या निधीतून २ कोटी रुपयांची कामे नगर शहरात प्रस्तावित केल्याची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा