डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागाला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने नेतिवली टेकडीवर जलशुद्धीकरणाचे एक केंद्र राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून बांधले आहे. या केंद्राच्या नवीन जलकुंभासाठी निकृष्ट दर्जाची रेती, ग्रीट आणि प्रमाण नसलेले बांधकामाचे साहित्य वापरल्याने जलकुंभाला चोहोबाजूने एक हजार भोके पडली आहेत. त्यामधून शेकडो लिटर पाणी दररोज फुकट जात आहे. जलकुंभाची तपासणी करण्यासाठी टाकीत पाणी टाकल्यानंतर ही परिस्थिती आहे तर येत्या काही वर्षांत हा निकृष्ट जलकुंभ कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केली.
सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या महापौर, नगरसेवकांचा पालिका प्रशासनावर अंकुश नसल्याने गेल्या अडीच वर्षांत बेफिकीर प्रशासनाने पालिका हद्दीतील विकासकामांचा पूर्णत: बोजवारा उडविला आहे. पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी नगरसेवक आपल्या महत्त्वाच्या फाइल्स, टीडीआर, इमारतीचे आराखडे मंजूर करून घेण्यात मश्गूल आहेत. विरोधी बाकावरील काही नगरसेवकही सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर मिसळत असल्याने ‘आपण सारे भाऊ मिळून सारे खाऊ’ असा कारभार पालिकेत सुरू आहे. या बेफिकीर कामाचा एक नमुना नेतिवली टेकडीला लागलेल्या गळतीमुळे पुढे आला आहे.
सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक कैलास शिंदे यांनी हा विषय सभागृहात उपस्थित केला होता. गेल्या वर्षीच आपण नेतिवली टेकडीच्या जलकुंभाच्या कामासाठी रेतीऐवजी ग्रीट पावडर वापरण्यात येत असल्याची बाब पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्या निदर्शनास आणली होती. आपल्या सूचनेकडे पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केले. आता जलकुंभात चाचणीसाठी पाणी टाकल्यानंतर त्याच्या चोहोबाजूने पाण्याचे एक हजार झरे लागले आहेत. या कामासाठी सुमारे १३० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. याशिवाय वाढीव खर्चही झाला आहे. कोटय़वधी रुपयांच्या कामाचा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच वाताहत झाली आहे. पाऊस, वाऱ्याच्या माऱ्यामुळे ही टाकी कोसळली तर परिसरातील झोपडपट्टीमधील शेकडो कुटुंबीयांना त्याची झळ बसेल. या जीवितहानीला जबाबदार कोण, असा प्रश्न नगरसेवक शिंदे यांनी केला.
आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी जलकुंभाच्या कामात कोणीतीही त्रुटी नाही. इरमा, आयआरएस यांच्या या कामात त्रुटी नसल्याचे अहवाल आहेत, असा दावा केला.
कुलकर्णी रडारवर..  
अभियंता कुलकर्णी याविषयी काहीही ऐकण्यास तयार नाहीत. आता टाकीला इंजेक्शन देऊन ही भोके बंद केली जातील, अशी उत्तरे ते देत आहेत. बांधकामाचे कोणतेही प्रमाण न ठेवता या जलकुंभाचे काम करण्यात आल्याने या जलकुंभाला भोके पडली आहेत. अगोदर लस न देता मग आजार झाला की इंजेक्शन ही कुलकर्णी यांची पद्धत चुकीची असल्याची टीका नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी केली. अभियंता कुलकर्णी हे आयुक्त सोनवणे यांचे लाडके असल्याने ते त्यांची पाठराखण करीत आहेत. बारावे ठेकेदार घोटाळा, वालधुनी पूल कोसळला, सीमेंट रस्त्यांचा बोजवारा या सर्वाना कुलकर्णी जबाबदार असताना आयुक्तांनी त्यांच्यावर का कारवाई केली नाही. अधिकाऱ्यांचे अती लाड आयुक्तांकडून सुरू असल्याने जनतेला त्याचे चटके बसत आहेत, अशी टीका नगरसेवक शरद गंभीरराव, संजय पाटील यांनी केली.
बैलेंना दुय्यम वागणूक
हायड्रोलिक इंजिनीअर म्हणून अशोक बैले मास्टर आहेत. त्यामानाने कुलकर्णी यांचे शिक्षण दुय्यम असूनसुद्धा बैले यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे. कुलकर्णी हे फक्त काम केल्याचा आव आणतात. प्रत्यक्षात त्यांची कृती शून्य असते. कुलकर्णीचे पदभार कमी करून ते दौऱ्यांपेक्षा अधिक वेळ पालिकेत कसे काम करतील अशी कामे त्यांना द्या, अशी सूचना मंदार हळबे, रवी पाटील यांनी केली. कनिष्ठ अभियंते फक्त ठेकेदारांची बिले काढण्यात मश्गूल असतात. त्यांना घटनास्थळी भेट देण्यास आता वेळ नसतो, अशी टीका राजेंद्र देवळेकर यांनी केली. राहुल चितळे, राहुल दामले, वैशाली राणे, डॉ. शुभा पाध्ये यांनी प्रशासनावर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा