संगम चित्रमंदिराजवळील मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीचे काढण्याचे काम गतीने सुरू असले तरी ते पूर्ण होण्यास आणखी तीन दिवस लागणार आहेत. यामुळे १८ ठिकाणी महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. गळतीतून २० लाख लीटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांना पाण्याविना राहण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, नागरिकांना पाण्याची झळ बसू लागल्याने महापालिकेने टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
संगम चित्रमंदिराजवळील मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. ही जलवाहिनी अचानक फुटल्याने ई वॉर्डाचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. महापालिकेच्या वतीने गळती काढण्याचे काम गतीने सुरू झाले आहे. तथापि हे काम पूर्ण होण्यास आणखी तीन दिवसांचा कालावधी लोटणार आहे. त्यामुळे जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, कदमवाडी, भोसलेवाडी, रमणमळा, शाहू कॉलनी, शिवाजी पार्क, कावळा नाका, टाकाळा, रुईकर कॉलनी, न्यू शाहूपुरी, स्टेशन रोड आदी भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांना पाण्याची झळ बसू लागल्याने महापालिकेने टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्या बावडा शुद्धीकरण केंद्र येथील दोन आणि कळंबा शुद्धीकरण केंद्रातील दोन अशा चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पाण्याची टंचाई जाणवत असल्याने टँकर आला की त्या भोवती घागर, बादल्या घेऊन नागरिकांची गर्दी होत आहे. आणखी तीन दिवस हा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
आयआरबीचे दुर्लक्ष
शहरातील अंतर्गत रस्ते पूर्ण केल्यानंतर त्याच्या सेवावाहिन्या बदलण्याचे काम आयआरबीकडे सोपविण्यात आले आहे. हे काम न झाल्याने जलवाहिनी फुटल्याचा ठपका ठेवला जात आहे. सिमेंटच्या रस्त्याखाली दहा फूट खोलवर जलवाहिनी असल्याने दुरुस्तीच्या कामात अडचणी येत आहेत. जलवाहिनीला गळती लागल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निरोप दिला. त्यावर आयआरबी कंपनीने जलवाहिनी दुरुस्तीची जबाबदारी आपली नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. त्यामुळे भविष्यात गळती लागल्यास त्याच्या दुरुस्तीचे काम महापालिकेलाच करावे लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा