विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश असला, तरी विकासाच्या कामांवरून राजकीय कुरघोडीच्या नाटय़ास मात्र मतदारसंघात सुरुवात झाली आहे. उदगीर शहरातील पाणीप्रश्न, उड्डाणपूल अशा विविध विषयांवरून भाजपा आमदार सुधाकर भालेराव यांची कोंडी करण्यास काँग्रेसकडून जाहिरातबाजीचा आधार घेतला जात आहे, तर काँग्रेसचा अकारण श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची खिल्ली भालेराव यांनी उडविली.
उदगीर शहराला पावसाळय़ातही १५ दिवसांतून पाणी मिळते. शहरात काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, नागरिकांना वेळेवर पाणी दिले जात नाही, याबद्दल कोणाला खंत नाही. उदगीर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नांदेड जिल्हय़ाच्या िलबोटी धरणातील पाणी उदगीर शहरासाठी आरक्षित करण्याची मागणी आपण पाणीपुरवठामंत्र्यांकडे केली होती. मंत्र्यांनी पाणी आरक्षित करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले व शहराला िलबोटी धरणातून पाणीपुरवठा व्हावा, या साठी आपण सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे आमदार भालेराव यांनी म्हटले आहे.
शहरातील नळेगाव रस्ता व बीदर रस्ता येथील उड्डाणपूल पूर्ण करण्यास आपण शासन दरबारी प्रयत्न करून निधी आणला. दिवाळीनंतर उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रण दिले आहे. शहरातील नवीन विश्रामगृहाजवळ १५ कोटी रुपये खर्चाचा तिसरा उड्डाणपूलही मंजूर असून त्यासाठी ३५ लाख रुपये सुरुवातीची तरतूद सरकारने केली. शहरातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आपण प्रयत्नशील आहोत. मात्र, जाहिरातबाजी करून माजी आमदार न केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचा टोला भालेराव यांनी लगावला.
दुसरीकडे उदगीरचे नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी पत्रकार बैठक घेऊन भालेराव यांच्यावर तोंडसुख घेतले. उदगीर नगरपरिषदेने २००९-१० मध्ये िलबोटी धरणातून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सरकारला पाठवला होता. उपविभागीय मध्यम प्रकल्प उपविभागाने पालिकेला पत्र पाठवून िलबोटी धरणातून पाणी देणे शक्य नसल्याचे कळवले आहे. असे असताना आमदार मात्र िलबोटी धरणाचे पाणी उदगीर शहरासाठी मंजूर केल्याचे खोटेच सांगत आहेत. आमदारांनी िलबोटेचे पाणी उदगीरला आणल्यास आपण नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊ, असे आव्हान त्यांनी दिले. या बरोबरच माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या कार्यकाळातच नळेगाव रस्ता व बीदर रस्ता या दोन्ही उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली. सरकारने उड्डाणपुलासाठी रेल्वे बोर्डाकडे पसे जमा केल्याबद्दल सरकारचे आभार मानणाऱ्या जाहिराती प्रसिद्धीस देण्यात आल्या आहेत.
तीन दाढी, एक काडी!
पूर्वी चंद्रशेखर भोसले, बसवराज पाटील नागराळकर व राजेश्वर निटुरे यांच्यात आडवा विस्तव जात नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत हे तिघे एकत्र येऊन कारभार करीत आहेत. तिघांनीही दाढी राखली आहे. त्यामुळे उदगीर शहरात ‘तीन दाढी व एकच राजकीय काडी’ अशी टिपणी केली जात आहे.
विकासाच्या श्रेयासाठी कुरघोडय़ा
विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश असला, तरी विकासाच्या कामांवरून राजकीय कुरघोडीच्या नाटय़ास मात्र मतदारसंघात सुरुवात झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-09-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leapfrogs for credit of development