महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखेतर्फे आयोजित व्याख्यानमालेत विविध मान्यवरांनी आध्यात्मिकतेपासून विज्ञान तसेच आईच्या महतीपर्यंत आपले विचार मांडले.
व्याख्यानमालेचे उद्घाटन अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप, नगराध्यक्षा अनिता चौधरी, कार्याध्यक्ष डॉ. संतोष मालपुरे यांच्या उपस्थितीत होते. ‘थोर देवीभक्त संत विष्णुदासांची देवीभक्ती’ या विषयावर प्रा. कुलकर्णी यांनी पहिले पुष्प गुंफले. जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात चांगले-वाईट अनुभव येत असतात. या अनुभवातूनच कळत-नकळतपणे व्यक्तीकडून भाव-भावनांद्वारे अभिनय केला जातो. या अभिनयातून जीवनाकडे पाहिले तर कळते जीवन एक रंगपट आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मरतड कुलकर्णी यांनी केले. संत विष्णुदासाने खऱ्या अर्थाने मराठी वाङ्मयीन वैभव निर्माण केले आहे. नवरात्रोत्सवात देवीच्या ज्या आरत्या म्हटल्या जातात, त्या आरत्यांचा रचनाकार हा संत विष्णुदास आहे. विष्णुदासाचे अष्टक, आरत्या, पाळणा, श्लोक, भूपाळी, पोवाडा, शाहिरी यांसह अनेक विषयांवर विपुल लेखन करून खऱ्या अर्थाने भाषेला समृद्ध करण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी नमूद केले.
दुसरे पुष्प प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी ‘आई’ या विषयावर गुंफले. शिक्षकांत आई असतेच असे नव्हे, मात्र आईत शिक्षक असतोच. आई स्वत: देण्याचा धर्म पाळते. देता देता आपल्या मुलाला कळत-नकळत देण्याचा धर्मही शिकवीत असते. आईच्या पावला-पावलांत देवत्व सामावल्याचे जाणवते, असेही ते म्हणाले. आई लहान मुलाला चिऊ-काऊच्या घासाने अन्न भरविते. त्या वेळी मुलाला अन्नासह परिसराच्या वनस्पतीशास्त्राचे, प्राणीशास्त्राचेही ज्ञान देता देता चांदोमामापर्यंत घेऊन जाते. आई म्हणजे पहिली गुरू असते, असे पाटील यांनी सांगितले. या वेळी व्यासपीठावर प्रमुख कार्यवाह रामचंद्र गोसावी, उपाध्यक्ष गौतमकुमार निकम हेही उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता देव यांनी केले. आभार कवी रमेश पोतदार यांनी मानले.
तिसरे पुष्प गुंफताना कवी इंद्रजित भालेराव यांनी ‘काव्य वाचन’ या विषयाची ओळख करून दिली. कोणतेही साहित्य हे लेखकाने किंवा कविने अंत:करणापासून लिहिले तर निश्चितच ते समाजाच्या उपयोगी येते. त्या साहित्यातून कळत-नकळतपणे समाजप्रबोधनाचे कार्य होते. इतरांना जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. त्यामुळे अंत:करणातून निर्माण झालेले साहित्य व साहित्यिक समाजाला हवेहवेसे वाटतात, असे भालेराव यांनी सांगितले. साहित्य हे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांद्वारे समाजापुढे मांडले पाहिजे, असे सांगत त्यांनी शेतकऱ्याची आत्महत्या व त्याच्या मागे मुलांची होणारी वाताहत मांडणारी कविता त्यांनी म्हणून दाखविली.
स्त्रियांसाठी, स्त्रीमुक्तीचा संदेश देणाऱ्या कवितांपासून तर जात्यावरच्या ओव्यांपर्यंत प्रेक्षकांना काव्याची माहिती दिली. इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात असणारी ‘बाप’ कविता त्यांनी म्हणून दाखविली. ‘काटय़ाकुटय़ाचा तुडवीत रस्ता, गावाकडे चल माझ्या दोस्ता’ अशा गाजलेल्या कविता भालेरावांनी श्रोत्यांपुढे सादर केल्या. व्याख्यानमालेचे प्रायोजकत्व अॅड. सतीश पवार यांनी स्वीकारले होते.
‘मसाप’ व्याख्यानमालेत वैविध्यपूर्ण विषयांवरील वैचारिक मेजवानी
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखेतर्फे आयोजित व्याख्यानमालेत विविध मान्यवरांनी आध्यात्मिकतेपासून विज्ञान तसेच आईच्या महतीपर्यंत आपले विचार मांडले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-11-2013 at 07:23 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lecture series in maharashtra literature conference