पक्षी-प्राणी आणि नागरिकांच्या जीवाला चायनीज मांज्यामुळे निर्माण झालेला गंभीर धोका पाहता याविरुद्ध कायदेशीर लढाई सुरू झाली असून वाईल्डसरचे डॉ. बहार बावीस्कर, पीपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या करिष्मा गलानी आणि हेल्प फॉर अ‍ॅनिमलसचे स्वप्नील बोधने यांनी संयुक्तरित्या चायनीज मांज्यावर बंदी आणण्यासाठी अजनी पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दाखल केली आहे.
सोसायटी फॉर वाईल्डलाईफ कॉनसव्‍‌र्हेशन, एज्युकेशन अँड रिसर्च (वाईल्ड-सर) ही निसर्गसंस्था गेली पंधरा वष्रे वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.  संकटग्रस्त वन्यजीवांना वाचविणे, त्यावर योग्य ते उपचार करून त्यांच्या नसíगक अधिवासात परत सोडण्यात वाईल्डसर सक्रिय आहे. संक्रातीदरम्यान सगळीकडे पतंगोत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जात असला पतंगाच्या मांजामुळे दरवर्षी शेकडो पक्षी जखमी होऊन उपचाराअभावी मृत्यूमुखी पडत आहेत.  विशेषत: चायनीज मांज्यामुळे मानव आणि पक्ष्यांचा जीव धोक्यात येऊनही याचा सर्रास वापर केला जात आहे. चालू २०१३ मध्ये आतापर्यत पाच गव्हाळी घुबड, चार इगल आऊल, एक शिकरा, दोन कावळे, एक भारद्वाज, एक वटवाघूळ आणि एक कृष्णपक्षी चायनीज वा नायलॉन मांज्यामध्ये अडकून जखमी झाले होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात पाच पक्षी झाडावर लटकत असलेल्या चायनीज आणि नायलॉन मांज्यात अडकून मृत्युमूखी पडले. याची माहिती
चंद्रशेखर गाणार आणि अरूण शास्त्रकार यांनी करिष्मा गलानी यांना दिल्यानंतर याचे गांभीर्य लक्षात घेऊन चायनीज मांज्याविरुद्ध कायदेशीर लढाई छेडण्याचा निर्णय तिन्ही स्वयंसेवी संस्थांनी घेतला आणि अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अजनी पोलिसांनी पक्ष्यांच्या मृतदेहांचा पंचनामा करून तक्रार नोंदविली आहे. स्वप्नील बोधने म्हणाले, यावर्षी हा चायनीज आणि नायलॉन मांजा खुलेआम बाजारात विकला गेला. त्यामुळे पक्ष्यांच्या जखमी होण्याच्या घटनांतरही वाढ झाली आहे.  डॉ. बहार बावीस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात सरकारने चायनीज अर्थात नायलॉन मांज्यावर बंदी आणली असून महाराष्ट्र सरकारकडून बंदी अपेक्षित आहे. मांज्यात अडकल्यानंतर कधी पाय तुटलेल्या तर कधी पंख कापले गेलेल्या अवस्थेत जखमी पक्षी आमच्याकडे येत असल्याने त्यांचा जीव वाचण्याची शक्यता फार कमी असते, याचाही उल्लेख त्यांनी केला. पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेले पशुपक्षी आढळून आल्यास ९९७५६८०३७५ या मोबाईलवर संपर्क साधता येईल.