साताऱ्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मोटारीची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखणी बंद आंदोलन केले. यामुळे आज दिवसभर शासकीय कार्यालयात शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान कर्मचाऱ्यांनी अचानक लेखणी बंद आंदोलन सुरू केल्याने सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याने आंदोलन मागे घेण्याची मागणी शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.     
माण तालुक्यातील दुष्काळसदृश स्थिती असल्याने तेथील चारा छावण्या सुरू ठेवाव्यात, या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी साताऱ्याचे अपर जिल्हाधिकारी बी.एस.पऱ्हाड यांच्या मोटारीची तोडफोड केली होती. या घटनेच्या निधेधार्थ कोल्हापूर जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आंदोलन केले. आंदोलनामध्ये पुणे महसूल विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर अशा प्रकारचे हल्ले होत असतील, तर इतर जिल्ह्य़ातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करून महसूल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विलास कुरणे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाडीची नासधूस करण्याच्या प्रकाराचा निषेध नोंदविला.    
मंगळवारच्या आंदोलनात निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, अपर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज, महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, रोजगार हमी उपजिल्हाधिकारी स्वाती देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे, राधानगरी प्रांताधिकारी मोनिका ठाकूर, राधानगरी तहसीलदार दगडू कुंभार, महसूल संघटनेचे पुणे विभाग कोषाध्यक्ष भाऊसाहेब झेले, तलाठी संघटक भारत काळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे महसूल कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.
अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. या आंदोलनाबद्दल नाराजी व्यक्त करीत भाजपाचे शहराध्यक्ष महेश जाधव, किशोर घाटगे, राहुल चिकोडे, संतोष भिवटे, नगरसेवक सुभाष रामुगडे, आर.डी.पाटील, सुरेश जरग आदींनी आंदोलन मागे घेण्याची मागणी केली.
 एकीकडे परप्रांतीय नागरिकाने बलात्कार केला असून त्याचे पडसाद शहरात उमटले असतांना परप्रांतीयांवर दमदाटी करू नका, असे आवाहन प्रशासन करते. तर दुसरीकडे शासन साताऱ्यात झालेल्या घटनेसाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे, असा आरोप भाजपाने केला आहे.