पनवेलपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्यांची संख्या खूप असते. मात्र गेल्या काही काळापासून या अभयारण्यात धडधाकट बिबटय़ा फिरत असल्याच्या वृत्ताने पक्षप्रेमींमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी या बिबटय़ाने अद्याप पर्यटकांना दर्शन दिलेले नाही. येथील वन विभागात काम करणारे कर्मचारी आणि किल्ला परिसरात राहणारे आदिवासी बिबटय़ाच्या दर्शनवृत्ताला दुजोरा देतात. मात्र हा बिबटय़ाचा मुख्य जंगलातच वावर असल्यामुळे पर्यटकांना त्याचा धोका नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
१२ किलोमीटरच्या जंगलमय परिसरात हे पक्षी अभयारण्य विस्तारले आहे. जंगलात अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणवठे आणि मोठय़ा प्रमाणात खाद्यासाठी जनावरे असल्याने हे वाघोबाच्या रूपातले बिबटे सुरक्षित आहेत. मुख्य जंगलात पर्यटकांचा वावर नसतो. कर्नाळ्यात वन्यजीव विभागाच्या सक्रिय वावरामुळे येथे शिकाऱ्यांना संधी साधता आलेली नाही. परंतु येथे बिबटय़ाचा वावर असल्याने अनेकांची भंबेरी उडाली आहे. या बिबटय़ाचे खाद्य सध्या जंगलातील इतर प्राणी आहेत. त्याची भूक भागत असल्याने त्याने अद्याप जंगलाची हद्द सोडली नाही. यामुळेच हा बिबटय़ा कमी प्रमाणात दिसतो आणि इतर ठिकाणी आपल्या शिकारीचा शोध करीत नसल्याचे वन विभागाचे अधिकारी नाव न छापण्याच्या अटीवर सांगतात. या बिबटय़ाचे वय अंदाजे १० वर्षांएवढे आहे. कर्नाळा हे पक्षी पाहण्याचे निसर्गरम्य ठिकाण आहे. निसर्गाच्या कुशीत बसून पक्ष्यांच्या कल्लोळात आणि ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी येथे पर्यटक येतात.
बिबटय़ाच्या कर्नाळ्यातील वावरामुळे पर्यटकांनी भीती व्यक्त केली आहे. कर्नाळाप्रमाणे माथेरानच्या जंगलातही एक मादी बिबटय़ा आणि तिचे दोन बछडे फिरत असल्याचा गोपनीय अहवाल वन विभागाने पाठविला आहे. येथील आदिवासींच्या पाहणीत हा बिबटय़ा परिवार आल्यापासून आदिवासी बांधव धास्तावले आहेत. कर्नाळा आणि माथेरानच्या जंगलात अजूनही या बिबटय़ांना पोषक वातावरण, खाद्य असल्यामुळे त्यांनी कधीही आपली वक्रदृष्टी पर्यटक किंवा स्थानिकांकडे वळवलेली नाही. यामुळे या बिबटय़ांची शिकार स्थानिकांनी करू नये यासाठी वन विभागाचेही प्रयत्न सुरू आहेत.
कर्नाळ्यात बिबटय़ा
पनवेलपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्यांची संख्या खूप असते.
First published on: 21-01-2014 at 07:16 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard at karnala bird sanctuary