जंगलातील बिबटय़ाने आता शहरात प्रवेश केला असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया मागे असलेल्या टेकडी टॉवर वस्तीतील नितेश गेडाम (२३) याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना आज पहाटे तीन वाजताची आहे. नितेशला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या परिसरातील ही तिसरी घटना असतांनाही वनखात्याने मात्र पिंजरा लावलेला नाही.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफरझोन व ग्रामीण भागात बिबटय़ा व वाघाने धुमाकूळ घालून आतापर्यंत १२ लोकांचे बळी घेतले. त्याचा परिणाम बिबटय़ाची दहशत आज संपूर्ण जिल्ह्य़ात पसरलेली आहे. जंगलातील बिबट गावात आला आणि आता तो शहरात सुध्दा दाखल झालेला आहे. चंद्रपूर-बल्लारपूर बायपासवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामागे टेकडी टॉवर वस्ती आहे. हा परिसर जुनोना जंगलाला लागून आहे. या वस्तीत रोजंदारी काम करणारे मजूर व छत्तीसगडी कामगारांचे वास्तव्य आहे. काल बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या प्रभागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे बहुतांश कुटूंब मोकळ्या अंगणात झोपलेले होते. नितेश गेडाम हा कुटुंबीयांसोबत अंगणात झोपलेला असतांना पहाटे तीन वाजताच्या सुमारास बिबटय़ा वस्तीत आला व त्याने अंधारात नितेशवर हल्ला केला. नितेशची मान जबडय़ात पकडून त्याला फरफटत नेत असतांनाच किंचाळण्याच्या आवाजामुळे वस्तीतील इतरही लोक जागे झाले. त्यांनी लालटेन दाखविला असता बिबट नितेशला सोडून जंगलात पळून गेला. बिबटय़ाने नितेशच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केल्याने रक्तस्त्राव सुरू होता. त्याला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती नाजूक आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी काळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून जखमीच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत दिली. दरम्यान, बिबटय़ाच्या हल्ल्याची या वस्तीतील सलग तिसरी घटना आहे. बिबटय़ाचे एका पाठोपाठ एक हल्ले बघता वस्तीतील लोकांनी जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली. मात्र अजूनही येथे तो लाण्यात आलेला नाही. त्यामुळे वनखात्याप्रती तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूरमध्ये बिबटय़ाच्या हल्ल्यात तरुण गंभीर
जंगलातील बिबटय़ाने आता शहरात प्रवेश केला असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया मागे असलेल्या टेकडी टॉवर वस्तीतील नितेश गेडाम (२३) याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना आज पहाटे तीन वाजताची आहे.
First published on: 07-06-2013 at 04:00 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard attack youth injured