संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या कोलशेत परिसरातील नागरिक सध्या बिबळ्यांच्या संचारामुळे दहशतीच्या सावटाखाली आहेत. विशेष म्हणजे नाविक तसेच वायू दल केंद्र कर्मचाऱ्यांच्या वसाहतींनाही त्याची झळ बसत असून वन विभागातर्फे सातत्याने प्रयत्न करूनही अद्याप एकही बिबळ्या सापळ्यात अडकलेला नाही. अकराशे एकरच्या या घनदाट जंगलात नर आणि मादी असे किमान दोन बिबळे असावेत, असा वन विभागाचा अंदाज आहे. बिबळ्यांना पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी नव्याने शोधमोहीम राबवली. नाविक तसेच वायू दल केंद्र परिसरात प्रत्येकी एक सापळाही लावण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याचा उपयोग झालेला नाही. कोलशेत परिसरातील या जंगलात नाविक तसेच वायू दलाचे केंद्र आहे. या केंद्र कर्मचाऱ्यांच्या वसाहतीही याच जंगलात आहेत. हिरानंदानी गृहसंकुल तसेच काही बंद पडलेल्या कंपन्या येथे आहेत. बिबळ्याच्या दहशतीमुळे येथील नागरिकांना एकटे-दुकटे बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बिबळ्यांना पकडावे, असे आवाहन त्यांनी वन विभागाला केले आहे.
सीसीटीव्हीत दर्शन       
 वन विभागाने बिबळ्याला पकडण्यासाठी दोन जिवंत बकरे असणारे पिंजरे जंगलात ठेवले आहेत. मात्र या सापळ्यांमध्ये अद्याप बिबळ्या अकडलेला नाही. संकुलात सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मात्र वसाहतीलगत बिबळ्याचा संचार दिसून आला आहे.
फटाके किंवा डबे वाजवा
प्रयत्नांची शिकस्त करूनही बिबळ्या सापळ्यात अडकत नसल्याने आता वन विभागाने नागरिकांनाच सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. लहान मुलांना एकटे सोडू नका. विशेषत: सकाळी अथवा रात्री उशिरा एकटय़ाने बाहेर पडू नये. बिबळ्यांचा वसाहतीजवळील संचार टाळण्यासाठी फटाके अथवा डबे वाजवावेत, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात येत असल्याची माहिती ठाणे विभागाचे सहाय्यक वन संरक्षक सुधीर पडवळे यांनी केले आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा