तालुक्यातील पुनद खोऱ्यातील दरी शिवारात गोठय़ात बिबटय़ाचे वारंवार दर्शन होत असल्याने आणि गोठय़ात बांधलेल्या गाईचा त्याने फडशा पाडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बिबटय़ाची दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने बिबटय़ास पकडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खळजी परिसरातील दरी भागात बिबटय़ा दिसणे हे ग्रामस्थांसाठी आता विशेष राहिलेले नाही. परंतु अलीकडे बिबटय़ा गाई-बैलांवर हल्ले करू लागल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. यापूर्वी बिबटय़ाने शेळ्या फस्त करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मागील आठवडय़ात शेतकरी देविदास चौरे यांच्या गोठय़ात बांधलेल्या गाईचा बिबटय़ाने फडशा पाडला. त्यांनी तात्काळ ही माहिती कळवण वन विभागाच्या कार्यालयास कळविली. बिबटय़ाच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी धास्तावले असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास, पिकांना पाणी देण्यासाठी सुरक्षिततेचे सर्व उपाय योजत जावे लागत आहेत. त्यामुळे  बिबटय़ास तात्काळ जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. लवकरच बिबटय़ास जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी के. आर. जोशी यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा