व्याघ्रगणना सुरू असतानाच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनलगत भद्रावती वनपरिक्षेत्रातील चोराच्या जंगलात एका पूर्णवाढ झालेल्या बिबटय़ाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी ट्रान्झिटलाईनलगत वाघांचे आठ ते दहा पगमार्क मिळाल्याने दोन पट्टेदार वाघांच्या लढाईत बिबटय़ाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनाधिकारी व्यक्त करीत आहेत.
सध्या देशभरातील व्याघ्र प्रकल्प व नियमित जंगलात मांस व तृणभक्षी प्राण्यांची गणना सुरू आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प व चंद्रपूर वन विभागात व्याघ्र गणनेचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे काम सुरू असतांनाच गुरुवारी सकाळी सहा वाजता भद्रावती वन परिक्षेत्रातील चोराच्या जंगलात पूर्ण वाढ झालेल्या बिबटय़ाचा मृतदेह सापडला. व्याघ्रगणनेसाठी वनपाल व वनमजूर गस्तीवर असतांना चोराच्या जंगलात ईरई धरणाच्या बाजूने कक्ष क्रमांक २०५ मध्ये बिबटय़ासारखा दिसणाऱ्या प्राण्याचा मृतदेह पडून होता. या घटनेची माहिती वनमजुरांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मुंडे यांना दिली. लागलीच मुंडे घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी बघितले असता बिबटय़ाचा मृतदेह पूर्णत: कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे चंद्रपूर वन विभागाचे विभागीय वनाधिकारी एन.डी. तिवारी, सहायक उपवनसंरक्षक पवार, पशुवैद्यकीय अधिकारी बावणे घटनास्थळी आले.
पंचनामा व शरिराचे परीक्षण केल्यानंतर मृतदेह बिबटय़ाचा असल्याचे निदर्शनास आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बावणे यांनी केलेल्या शवविच्छेदनात मृतदेहाचे कारण नैसर्गिक मृत्यू सांगण्यात आले असले तरी परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे दोन पट्टेदार वाघांच्या तावडीत सापडलेल्या बिबटय़ाचा वाघांनीच बळी घेतल्याची माहिती विभागीय वनाधिकारी एन.डी.चौधरी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.  
 सध्या व्याघ्रगणना सुरू असल्याने या घनदाट जंगलात बिबटय़ाचा मृतदेह जेथे सापडला त्या ठिकाणी दोन पट्टेदार वाघाचे आठ ते दहा पायांचे ठसे दिसले. त्यावरून या परिसरात दोन पूर्ण वाढ झालेल्या पट्टेदार वाघांचे बऱ्याच दिवसांपासून वास्तव्य आहे.
हे दोन्ही वाघ इरई धरण ते चोरा या परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले, तसेच घटनेच्या दिवशीही हे दोन्ही वाघ याच ठिकाणी असावे, असाही अंदाज चौधरी यांनी व्यक्त केला. परिस्थितीजन्य पुरावे बघता हा बिबट हा दोन वाघांच्या तावडीत सापडून दोन वाघांशी झालेल्या लढाईत बिबटय़ाचा मृत्यू झाला असावा, असेही ते म्हणाले. दरम्यान, या बिबटय़ाचे अवयव तपासणीसाठी हैदराबाद, बंगलोर व नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा