घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. बंद कंपन्यांमध्ये डुक्कर, उंदरांचा वावर आहे. कुत्रा हे बिबटय़ाचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे या खाद्याच्या शोधात तो मानवी वस्तीत येतो. शक्यतोवर आपल्यापेक्षा उंच गोष्टीवर बिबटय़ा हल्ला करत नाहीत, असा अनुभव वन संरक्षक पडवले यांनी व्यक्त केला. ज्या भागात बिबटय़ाची भीती आहे तेथील उद्यानांमध्ये लहान मुलांना एकटे सोडू नये, अशा सूचना रहिवाशांना देण्यात आल्या आहेत. रात्री उशिरा घुंगरू अडकवलेल्या काठय़ा घेऊन फिरायला निघावे, अशा सूचनाही वन विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.
घोडबंदर परिसरात वारंवार दर्शन देणाऱ्या बिबटय़ामुळे या भागातील रहिवाशांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली असली तरी या संपूर्ण मुलखाचा मूळ रहिवासी बिबटय़ाच आहे याची जाणीव गगनचुंबी इमारतीत राहाणाऱ्या रहिवाशांना व्हावी यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक कोळी आणि मूळ रहिवाशांची मदत घेण्याचे ठरवले आहे. बिबटय़ाला पकडण्यासाठी सध्या हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे एखाद्या सापळ्यात तो सापडला तरी या परिसरात पुन्हा बिबटय़ाचे दर्शन होणार नाही, याची खात्री कुणालाच देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका वन अधिकाऱ्यांनी घेतली आहे. हा मुलुख त्याचा आहे, त्यामुळे तो येथे येणारच असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत असून यामुळे लाखो, कोटी खर्च करून निसर्गाच्या कुशीत घरे थाटणाऱ्या नव्या ठाणेकरांचा संसार यापुढेही बिबटय़ाच्या संगतीनेच सुरू राहील, असे एकंदर चित्र आहे.
मानवी वस्तीत शिरणाऱ्या बिबळ्याला जेरेबंद करण्यात वन विभागाला अपयश येत असल्यामुळे ठाणेपल्याड नव्या शहरात वसलेले घोडबंदरवासी सध्या कमालीचे नाराज आहेत. बिबटा सापडत नाही म्हणून हे रहिवासी येथे येणाऱ्या वन अधिकाऱ्यांशी जागोजागी हुज्जत घालताना दिसत आहेत. आमच्या लहान मुलांच्या जीविताचा प्रश्न आहे, असा आक्रोश करत रविवारी हिरानंदानी संकुलात राहणाऱ्या रहिवाशांनी वन अधिकाऱ्यांना घेराव घातला. काही रहिवासी तर या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत होते, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या प्रश्नावर रहिवासी कमालीचे आक्रमक बनल्यामुळे वन अधिकाऱ्यांनी या परिसरातील जंगलात राहणाऱ्या जुन्या रहिवाशांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून घोडबंदरच्या खाडीत मासेमारीसाठी जाणाऱ्या कोळी बांधवांना पिढय़ान्पिढय़ा बिबळ्याचे दर्शन होते आहे. कधी तरी वाटेत त्याच्याशी नजरानजर झालीच तर हातातील काठी उगारायची की तो आपल्या वाटेने निघून जातो, असा अनुभव या भागात मासेमारी करणाऱ्यांनी वन अधिकाऱ्यांकडे कथन केला आहे. त्यामुळे येथील मूळ रहिवासी बिबळ्या आहे, माणूस नाही हे नव्या ठाणेकरांना पटवून देण्याचा प्रयत्न या कोळी बांधवांच्या मदतीने सुरू करण्यात आला आहे.
तो परतणारच..
कोलशेत, ब्रह्मांड, डोंगरीपाडा, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, वायुदल वसाहत या सगळ्या भागात सहा महिन्यांपासून बिबळ्याची दहशत आहे. परंतु हा प्रश्न एका बिबळ्यापुरता मर्यादित नाही, अशी माहिती ठाणे विभागाचे साहाय्यक वनसंरक्षक सुधीर पडवले यांनी वृत्तान्तला दिली. या भागातील सुमारे एक ते दीड हजार एकर परिसरात पसरलेल्या दाट जंगलांचा आणि पर्यायाने नागरी वस्तीलगतच्या परिसराचा मूळ रहिवासी बिबटय़ाच आहे. या परिसरातील सुमारे १२०० एकर क्षेत्रफळ झाडांनी व्यापले असून त्यापैकी ३० टक्के परिसरात गेल्या काही वर्षांपासून इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. काही इमारती या थेट वन जमिनींवर उभ्या आहेत, तर काही खाडीकिनारी जंगलांच्या पायथ्याशी उभ्या राहिल्या आहेत. येथील जुन्या, बंद पडलेल्या कंपन्यांमधून ‘त्याचा’ कायम वावर दिसून आला आहे. मानव निर्मिती भिंतींची वेस ओलांडून तो येथे येणार नाही, याची खात्री कुणालाही देता येणार नाही. त्यामुळे वारंवार दर्शन देणाऱ्या बिबटय़ाला जेरबंद केले गेले तरी या संपूर्ण मुलखात बिबटय़ा परतणार नाही याची खात्री कुणालाही देता येणार नाही, असे मत पडवले यांनी व्यक्त केले. तरीही त्याला पकडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा