फुर्डी हेटी येथे विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला तब्बल चार तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर रात्री ११.३० वाजता जिवंत बाहेर काढण्यात वनखात्याच्या पथकाला यश आले. या बिबटय़ाला रात्रीच धाबा वनपरिक्षेत्रातील जंगलात मुक्त करण्यात आले.
गोंडपिंपरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या धाबा वनपरिक्षेत्रातील फुर्डी हेटी या गावातील सिध्दार्थ तेलसे यांच्या शेतातील विहिरीत दुपारी एक वाजताच्या सुमारास बिबट पडला. या घटनेची माहिती मिळताच गावकरी व वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, काही केल्या बिबटय़ा विहिरीबाहेर येत नव्हता. शेवटी चंद्रपूर वन विभागाचे विभागीय वन अधिकारी एन.डी. तिवारी यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी एन.डी.बल्की यांच्या नेतृत्वाखाली रॅपीड फोर्स पाठविण्यात आली. ही फोर्स रात्री ८ वाजता घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर विहिरीत मोठा पिंजरा सोडण्यात आला. मात्र, काही केल्या बिबट पिंजऱ्यात येत नव्हता. साधारणत: अडीच वष्रे वयाचा हा बिबट वन अधिकाऱ्यांना चकमा देत होता. तब्बल तीन तासाच्या अथम परिश्रमानंतर शेवटी रात्री ११ वाजता बिबट कसाबसा पिंजऱ्यात आला. त्यानंतर पिंजऱ्याला विहिरीबाहेर काढण्यात आले.
बिबट विहिरीबाहेर येताच त्याला बघण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. बिबटय़ा उंचावरून विहिरीत पडल्याने त्याच्या शरिराला काही इजा अथवा दुखापत, जखम होण्याची शक्यता लक्षाात घेता रात्रीच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र, या वैद्यकीय तपासणीत काहीही निघाले नाही. या बिबटय़ाला पिंजऱ्यात ठेवले तर तो सुध्दा माणसाळेल त्यामुळे त्याला रात्रीच जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पिंजरा एका ट्रॅक्टरवर ठेवून गावापासून काही दूर अंतरावर आणण्यात आला. तेथे पिंजऱ्याचा दरवाजा उघडताच बिबटय़ाने जंगलात धूम ठोकली. रात्रीच्या अंधारात बिबट कधी जंगलात दूरवर निघून गेला, हे कळलेही नाही. हे रेस्क्यू ऑपरेशन चंद्रपूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एन.बल्की, पाकेवार, खनके, खोब्रागडे, डांगे यांच्या पथकाने यशस्वीपणे राबविले. बिबट वा अन्य वन्यप्राणी विहिरीत पडू नये म्हणून वनखात्याने परिसरातील शेतकऱ्यांना विहिरीला कठडे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा