संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर आणि मासोद परिसरात बिबटय़ाचा वावर वाढल्याने या भागांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. काही लोकांना या भागात बिबटय़ा आढळला. पोहऱ्याच्या जंगलात बिबटय़ांचे वास्तव्य असले, तरी अमरावती शहरालगतच्या या भागापर्यंत बिबटे पोहचले नव्हते. काही वर्षांपूर्वी अकोली परिसरात बिबटय़ाने धुमाकूळ घातला होता. त्याची पुनरावृत्ती होईल काय, हा प्रश्न चर्चेत आला आहे.
दोन आठवडय़ांपूर्वी वनविभागाच्या वडाळी येथील रोपवाटिकेतील पिंजऱ्याजवळ दोन बंदिस्त नर बिबटय़ांच्या जवळ एक मादी बिबट येत होती. एका वन कर्मचाऱ्याला या मादी बिबटाची चाहूल लागली होती. नंतर वन विभागाने कॅमेरा ट्रॅप लावला, त्यात तिची छायाचित्रे टिपल्या गेली होती. पण नंतर या मादी बिबटाचे दर्शन झाले नाही. काही दिवसांपूर्वी अमरावती विद्यापीठाच्या तलावाशेजारी झुडूपांमध्ये बिबट लपून असल्याचे काही लोकांना दिसले. या बिबटाच्या पंजाचे ठसेही आढळले. वन विभागाच्या पथकानेही तलावाजवळ पाहणी केली, तेव्हा बिबटय़ाच्या वास्तव्याच्या खुणा आढळल्या. मात्र, आतापर्यंत या भागात वावर असलेल्या बिबटय़ाने कुणावरही हल्ला केलेला नाही.
बुधवारी मासोद परिसरात पोलिसांच्या गस्तीदरम्यान काही पोलीस कर्मचाऱ्यांना मार्डी मार्गावर बिबट रस्ता ओलांडताना दिसला. या भागातील झुडूपांमध्ये तो लगेच दिसेनासा झाला. विद्यापीठ परिसरात बिबटय़ाच्या वास्तव्याचे पुरावे आढळले असून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त या भागात वाढवण्यात आल्याचे उपवनसंरक्षक नीमू सोमराज यांचे म्हणणे आहे. बिबटय़ाला पकडण्याची सज्जता आहे, त्याचा उपद्रव वाढल्यास त्याला जेरबंद केले जाईल, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मार्डी मार्गावरील एका संत्र्याच्या बागेत बिबटय़ाचे वास्तव्य असल्याने एका रखवालदाराने सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले होते. विद्यापीठ परिसरात उकिरडय़ावर टाकलेले शिळे अन्न खाण्यासाठी कुत्रे आणि डुक्करे येतात. या सावजांच्या शोधात बिबटय़ा या भागात येत असावा, असे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.
मार्डी मार्गावर गस्त वाढवण्यात आल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे, सोबतच विद्यापीठ प्रशासनानेही या प्रकरणात सुरक्षा रक्षकांना कामावर लावले आहे. संभाव्य मानव-प्राणी संघर्ष टाळण्यासाठी विद्यापीठाच्या तलावाच्या काठावर नागरिकांना फिरण्यास तूर्त मज्जाव करण्यात आला आहे. या तलावाच्या काठावर दररोज सकाळी आणि सायंकाळी फिरणाऱ्यांची गर्दी होत असते. पण बिबटय़ाच्या वास्तव्याची चर्चा सुरू झाल्यानंतर लोकांची संख्या रोडावली आहे. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या मागील भागात बिबटय़ाने तीन शेळया फस्त केल्या होत्या, अशी माहिती मिळाली आहे. हा बिबटय़ा भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात या भागात शिरला असावा, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.
पोहऱ्याच्या जंगलात यापूर्वी अनेकदा या मार्गावरून जाणाऱ्या लोकांना बिबटय़ाचे दर्शन झाले आहे. विद्यापीठ परिसरात आढळून आले बिबट हे वडाळी रोपवाटिकेत आलेले मादी बिबट आहे, की अन्य बिबट आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा