सोमवारी पहाटेच्या सुमारास देवळालीहून काही अंतरावर असलेल्या रेल्वेमार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वेगाडीचा धक्का बसल्याने बिबटय़ा मृत्युमुखी पडला. बिबटय़ा सहा वर्षांचा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परिसरात काही दिवसांपासून बिबटय़ांचा मुक्तसंचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबटय़ांच्या भीतीमुळे त्यांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.
उन्हाळ्यात टंचाई जाणवत असल्याने दोन महिन्यांपासून देवळालीच्या बार्न्स स्कूल परिसरात लष्कराच्या हद्दीतील जंगलात बिबटय़ांचा वावर वाढला आहे. याविषयी वनविभागाला माहिती देण्यात आली होती. मागील आठवडय़ात बिबटय़ाने चौधरी यांच्या मळ्यातील शेळी व डुक्कर फस्त केले होते. त्यांनी आरडाओरड करताच बिबटय़ाने धूम ठोकली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाण्याच्या शोधार्थ बिबटय़ा दारणा काठ परिसरात फिरत होता. याच वेळी भगूर-लहवित रस्त्यावरील डोंगरे यांच्या मळ्यालगत रेल्वेमार्ग ओलांडताना रेल्वेगाडीचा धक्का लागून बिबटय़ा फेकला गेला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. सकाळी ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास आल्यावर वनविभाग व पोलिसांना माहिती देण्यात आली. साहाय्यक वनसंरक्षक प्रदीप भामरे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, वनपाल एम. एस. गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेत बिबटय़ाला ताब्यात घेतले.
दारणा काठ परिसरातील देवळालीसह भगूर, पांढुर्ली, वंजारवाडी, लोहशिंगवे, लहवित, दोनवाडे, शिवडा आदी गावांमध्ये बिबटय़ांचा वावर असल्याने काही गावांत वनविभागाने पिंजरादेखील लावला आहे. लष्करी हद्दीतून बिबटे नागरी वसाहतीत प्रवेश करतात. पाणीटंचाई व भक्ष्याच्या शोधार्थ ते नागरी वस्तीकडे येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या अपघाताने परिसरातील बिबटय़ांच्या मुक्त संचारावर शिक्कामोर्तब केले आहे. वनविभाग पिंजरा लावून निघून जाते, परंतु बिबटे जाळ्यात सापडत नसल्याने स्थानिकांना पाचावर धारण करून दिवस काढावे लागत असल्याची भावना व्यक्त झाली.
रासबिहारी जोडरस्त्याचे मूळ दुखणे कायम
सोमवारी पहाटेच्या सुमारास देवळालीहून काही अंतरावर असलेल्या रेल्वेमार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वेगाडीचा धक्का बसल्याने बिबटय़ा मृत्युमुखी
First published on: 19-05-2015 at 06:54 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopards death