मुंबईत १९-२० जूनला भरभरून कोसळलेल्या पावसाने जुलै महिन्यात उसंत घेतल्याने लेप्टोची साथ आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. पुरानंतर साधारण ३ ते २१ दिवसांत लेप्टोची लक्षणे दिसू शकतात आणि लेप्टोचे जिवाणू हे ओल्या मातीतूनही पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मात्र लेप्टोविरोधातील मोहीम सुरूच ठेवली आहे.
उंदीर, कुत्रे, पाळीव प्राणी यांच्या मलमूत्रातील लेप्टोचे विषाणू पुराच्या पाण्यात जातात. या पाण्यातून चालणाऱ्या व्यक्तीच्या पायाला जखम झाली असल्यास त्यातून ते शरीरात जातात. मात्र शरीरात गेल्यावरही लेप्टोची लक्षणे दिसण्यास तातडीने सुरुवात होत नाही. अंग मोडून येणारा ताप, डोकेदुखी, पोटदुखी ही लक्षणे साधारण ३ ते २१ दिवसांपर्यंत दिसू शकतात. त्यामुळेच १०-२० जून रोजी तुंबलेल्या पाण्यातून गेलेल्यांना जुलच्या पहिल्या आठवडय़ात लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली. १ ते ७ जुलदरम्यान मुंबईत २१ रुग्णांची नोंद झाली. त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला होता. लेप्टोची लक्षणे ही विषाणुजन्य तापासारखी असल्याने गल्लत होऊन रुग्णांचे योग्य निदान व त्यामुळे उपचार झाले नाहीत. त्यानंतर पालिकेने सर्वच तापाच्या रुग्णांकडे संशयित लेप्टोचे रुग्ण म्हणून पाहण्यास व त्यानुसार लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
गेल्या आठवडय़ाभरात ८ जुल ते १४ जुलदरम्यान चार रुग्णांचे मृत्यू झाले असून आणखी ३६ जणांना लेप्टोची बाधा झाली. त्यामुळे रुग्णांचा आकडा ५७ वर तर मृत्यूंचा आकडा १६ वर गेला. मात्र लेप्टोची लक्षणे दिसण्याचा काळ आता जवळजवळ संपत आला असल्याने लेप्टोच्या रुग्णांची संख्या कमी होण्याचा अंदाज आहे. पावसाने आता ब्रेक घेतला असल्याने लेप्टो पसरण्यास अनुकूल परिस्थिती नाही. मात्र पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून लेप्टोविषयी आरोग्य मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. लेप्टोचे विषाणू ओल्या मातीतही अनेक दिवस अस्तित्व टिकवतात. शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये लेप्टोचे विषाणू या स्थितीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही लेप्टोविरोधात मोहीम सुरूच ठेवली आहे, अशी माहिती संसर्गजन्य आजार प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. मिनी खेतरपाल यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लेप्टो दक्षिण व पूर्व उपनगरातही..
जुलच्या पहिल्या आठवडय़ात १ ते ७ जुल दरम्यान २१ जणांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाली होती. या दरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला. त्यातील केवळ एक रुग्ण वगळता इतर सर्व दहिसर-मालाड पट्टय़ातील होते. मात्र पुढील आठवडय़ाभरात लेप्टोचे चारपकी दोन मृत्यू हे पश्चिम उपनगरातील नव्हते. रे रोड येथील ४० वर्षांच्या पुरुषाचा तर विक्रोळी येथील ३१ वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे लेप्टो केवळ मुंबईच्या एका टोकाच्या भागात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जुल पहिल्या आठवडय़ात सातरस्ता येथेही २१ वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला होता. लेप्टोच्या रुग्णांची संख्याही सात दिवसात ३६ ने वाढली. हे रुग्ण शहराच्या विविध भागातील आहेत.

लेप्टोचे मृत्यू
दहिसर – २
बोरिवली – २
कांदिवली – ३
मालाड – ६
सातरस्ता – १
रे रोड – १
विक्रोळी – १

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leptospirosis control due to rain stopped
Show comments