कापूस आणि ज्वारी या पिकांचा पेरा घटण्याचे कारणही मधुभक्षिकांच्या संख्येत झालेली घट असल्याचे एका पाहणीत म्हटले आहे. नापिकीमुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या होत आहेत. ही पारंपरिक पिके लावण्याचे प्रमाणही कमी होत चालले आहे. कापसाला भाव नाही आणि ज्वारी लावणे परवडत नाही, अशी स्थिती आहे. यामागील मूळ कारणांमागे पिकांचा फुलोरा कमी होणे हेसुद्ध एक शास्त्रीय कारण आहे. शेतातील पिकांवर विषारी औषधांचा फवारा मारला जातो. याचे प्रमाण खूप जास्त असले तर त्याचे दुष्परिणाम मानवमित्र असलेल्या कीटकांवरही होतात. मधमाशा हा मानवाचा मित्र आहे. परागीकरणाच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी ही कीटक प्रजाती माणसाच्या हव्यापायीच आता संकटात सापडली आहे.
मधमाशांसाठी असलेले पोळे ओरबडताना ते संपूर्णपणे नष्ट करण्याच्या घटना वारंवार घडत असूनही वन खात्याचे अधिकारी मूग गिळून स्वस्थ बसले आहेत. मधाची लुटमार होऊ नये यासाठी पोळ्यातून मध काढण्यावर र्निबध आणण्याची नितांत आवश्यकता असून स्वयंसेवी संस्थांना पुढाकार घेण्याची गरज आहे. यवतमाळ हा कापसाचा पट्टा म्हणून ओळखला जात असला तरी आता यवतमाळात फिरल्यास काळीभोर जमीन तुम्हाला दिसते पण धुऱ्यावर एकही झाड दिसत नाही, ही स्थिती भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. यासाठी जंगलातून येणाऱ्या मधुभक्षिकांसाठी कृषीजमिनीच्या परिसरात मोठी झाडे असणे गरजेचे ठरते. कृत्रिम मध निर्मिती केंद्रे हा मानवाने शोधलेला तात्पुरता उपाय आहे. परंतु, मधमाशांची प्रजाती आपण झपाटय़ाने नष्ट करत आहोत, याची जाणीव लोकांना नाही.
मधमाशा विषारी असल्या तरी त्यांनी फुलांवर बसून गोळा केलेला मध आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि व्यापाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. निसर्गचक्रातील ही महत्त्वाची प्रक्रिया पोळी नष्ट करून खंडित केली जात आहे. त्यासाठी मध गोळा करण्याचे सशर्त परमीट आणि जबर रॉयल्टीचा मार्ग शोधल्यास पोळी ओरबडणाऱ्यांना आळा बसणार नाही. ज्येष्ठ वन अभ्यासक मारुती चितमपल्ली यांनीही मधमाशांच्या घटत्या संख्येबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून मधमाशांच्या बहुपयोगाबद्दल वन खाते आणि नवीन पिढी अवगत नसल्याबद्दल त्यांनी खंत केली. फळधारणेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी मधमाशांची अख्खी प्रजाती नष्ट करत असल्याची जाणीव लोकांना करून देणे आता आवश्यक झाले असून गल्लाभरू लोकांनी मधाचे व्यापारीकरण करण्याच्या हव्यासापायी अनावश्यक फायदा उचलू नये, यावर सरकारचे नियंत्रण असले पाहिजे, असेही त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. बेचव झालेला ट्रकलोड संत्रा रस्त्यावर फेकून दिला जातो. उलट या संत्र्याच्या रसाचा उपयोग करून रसाचे ट्रे शेतात ठेवल्यास त्यापासून मधमाशा मध तयार करू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेचे दिलीप गोडे यांच्या मते मधमाशांच्या पोळ्यातून मध गोळा करण्याची पद्धती अधिक विज्ञानाभिमुख झाल्याने मध अत्यंत शास्त्रीय पद्धतीने गोळा केला जात आहे. पूर्वीच्या काळी मधाच्या पोळ्याखाली आग लावून देण्याचे प्रकारही आता जवळजवळ बंद झाले आहेत. संत्रा उत्पादकांच्या पट्टय़ातील शेतकऱ्यांनी शेतात दहा दहा पेटय़ा जरी ठेवल्या तरी संत्र्यापासून मध तयार करण्याचे काम मधमाशा सहज करू शकतात. मधमाशांचे पोळे पूर्ण कापू नये, असे पूर्वापार संकेत आहेत. त्यामुळे २५ टक्के मध हा पोळ्यातच ठेवला पाहिजे. याचा दुरुपयोग केला जात असेल तर त्याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. फुलझाडे किंवा फळझाडांना पुरेसा फुलोरा येत नाही याची मधमाशांच्या घटत्या संख्येबरोबरच अनेक कारणे आहेत. केवळ एकाच यंत्रणेला यासाठी दोषी धरता येणार नाही, असेही गोडे यांनी सांगितले. (समाप्त)
मधमाशा कमी झाल्याने कापूस आणि ज्वारीचा पेरा घटला
कापूस आणि ज्वारी या पिकांचा पेरा घटण्याचे कारणही मधुभक्षिकांच्या संख्येत झालेली घट असल्याचे एका पाहणीत म्हटले आहे. नापिकीमुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या होत आहेत. ही पारंपरिक पिके लावण्याचे प्रमाणही कमी होत चालले आहे. कापसाला भाव नाही आणि ज्वारी लावणे परवडत नाही, अशी स्थिती आहे. यामागील मूळ कारणांमागे पिकांचा फुलोरा कमी होणे हेसुद्ध एक शास्त्रीय कारण आहे.
First published on: 29-05-2013 at 06:07 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Less honey bees affect cotton and jawar