लोकसत्ता, बहिशाल शिक्षण विभाग- मुंबई विद्यापीठ आणिनॅशनल पार्कचा संयुक्त उपक्रम
पावसाळा म्हणजे केवळ हिरवागार श्रतू एवढाच त्याचा परिचय नाही.. काही वनस्पतींचे आयुष्यच मुळी त्या पावसाळ्यापुरते असते. त्यानंतर त्यांचे दर्शन होते ते थेट पुढच्याच पावसाळ्यात. तसेच एरवी कोणत्याही ऋतूमध्ये न दिसणारे अशा अनेकविध कीटकांचे दर्शनही याच काळात होते. कारण हाच काळ असतो कीटकसृष्टीच्या बहरण्याचा. पावसाळ्यातील वनस्पतींच्या जीवनाबरोबरच ही कीटकसृष्टी समजावून घेण्याची संधी मुंबई विद्यापीठाचा बहिशाल शिक्षण विभाग, लोकसत्ता आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने उपलब्ध करून दिली आहे.
पावसाळ्याच्या या तीन महिन्यांमध्ये दर शनिवार आणि रविवारी त्यासाठी सिटीवॉक या निसर्गभ्रमंतीचे आयोजन करण्यात येते. या सिटीवॉकच्या निमित्ताने नॅशनल पार्कमधील संरक्षित भागामध्ये जाण्याची अनोखी संधी उपलब्ध होते. एरवी या संरक्षित भागामध्ये जायचे तर नॅशनल पार्कची विशेष परवानगी काढावी लागते. शिलोंढा या संरक्षित भागामध्ये ही निसर्गभ्रमंती करता येते. यावेळेस सोबत असतात विद्यापीठातील वनस्पतीतज्ज्ञ आणि प्राणीतज्ज्ञ. कधी एखादा रंगीबेरंगी बिटल नजरेस पडतो तर कधी फुलपाखराची अळी. अळी कोणती आणि कशी आहे यावरून कोशातून बाहेर आल्यानंतर ते कोणते फुलपाखरू असेल, ते तज्ज्ञ सांगतात. त्यामागचे विज्ञानही सांगतात तेव्हा एक वेगळीच कीटकसृष्टी आपल्यासमोर उलगडत जाते.
मुंबईत राहून आणि नॅशनल पार्कचे नावही अनेक वर्ष ऐकलेले असून कधीच इथे येणे झाले नाही. मात्र लोकसत्ता आणि बहिशाल शिक्षण विभागाच्या या उपक्रमाच्या निमित्ताने प्रथमच येणे झाले आणि आपण सर्व मुंबईकर निसर्गाच्या वैविध्याच्या बाबतीत खरोखरच श्रीमंत आहोत, हे मनोमन पटले अशा प्रतिक्रिया गेल्या आठवडय़ात आयोजित सिटीवॉकमध्ये लोकसत्ताच्या अनेक वाचकांनी व्यक्त केल्या.
सिटीवॉकसाठी येताना प्रत्येकाने आपला नाश्ता किंवा जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली सोबत आणायची आहे. या निसर्गभ्रमंतीसाठीचे शुल्क रु. २०० असून त्यात नॅशनल पार्क प्रवेशद्वारापासून सिलोंडापर्यंतचा प्रवास आणि तज्ज्ञांचे मानधन शुल्क व पार्कचे प्रवेशशुल्क यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी संपर्क बहि:शाल शिक्षण विभाग, दुसरा मजला, आरोग्य केंद्र इमारत, विद्यानगरी संकुल, कालिना, मुंबई. दूरध्वनी २६५३०२६६, २६५४३०११. या शिवाय नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या तंबूमध्ये सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळात विद्यापीठाच्या प्रतिनिधींकडेही नोंदणी करता येईल.
निसर्गरंगांची नवलाई अनुभवा!
लोकसत्ता, बहिशाल शिक्षण विभाग- मुंबई विद्यापीठ आणिनॅशनल पार्कचा संयुक्त उपक्रम
First published on: 02-08-2013 at 08:38 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lets feel the nature