अमेरिका या प्रगत देशाचे एक वैशिष्टय़ म्हणजे अत्यंत दर्जेदार संशोधन. तेथे शासकीय व खासगी स्वरूपातील व्यवसायात खूप स्पर्धा असते. सर्वोत्तम निर्मिती करून भरपूर आर्थिक लाभही मिळवला जातो. मोठी आर्थिक गुंतवणूक, उच्च दर्जाचे संशोधक, वैज्ञानिक व तंत्रज्ञ एकत्र येऊन काळाच्या पुढे जाऊन भविष्याचा नावीन्यपूर्ण वेध घेत प्रचंड नफा मिळवण्याची धडपड हे सर्व अमेरिकेच्या एकंदर तुफानी प्रगतीचे मर्म आहे.
मानवी जीवन अधिक सुखकारक व परिपूर्ण व्हावे. पृथ्वीवरील आणि अंतराळातील ज्ञात व अज्ञात क्षेत्रामधील आश्चर्ये शोधून काढावेत व त्याचा व्यावहारिक तसेच व्यावसायिक उपयोग करून घ्यावा याचे बीज प्रत्येक विचारवंतामध्ये असते. अमेरिकेतील अनेक विद्यापीठे संशोधनावर मोठा खर्चही करतात. दर्जेदार व नावीन्यपूर्ण उत्पादनांना अर्थातच जगभर बाजारपेठ उपलब्ध होते.
अमेरिकी सरकारचा प्रचंड निधी अंतराळ संशोधनात खर्च होऊ लागला होता, त्यानंतर विशेष म्हणजे गेल्या पंधरा वर्षांत अमेरिकी सरकारने अंतराळ संशोधनावरील आपला खर्च खूप कमी केला. आपोआपच खासगी व्यवसाय करणाऱ्यांनी या संधीचा फायदा उठवला आहे. ज्याप्रमाणे संगणक, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सिलिकॉन व्हॅली या नावाने ओळखल्या जाणारी जागतिक दर्जाची बाजारपेठ उभी केली त्याच स्वरूपात स्पेस एक्स्प्लोरेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच स्पेसएक्स या खासगी कंपनीने आता व्यावसायिक दर्जाही प्राप्त केला आहे. लॉसएंजेल्सपासून दीडशे कि.मी अंतरावर कॅलिफोर्नियाच्या काहीशा वाळवंटी प्रदेशात मोजोव्हे एअक अँड स्पेस क्षेत्रात गेटवे टू स्पेस नावाची खासगी अंतराळ संशोधन वसाहत आता नावारूपास आलेली आहे. नासा या शासकीय अंतराळ संशोधन संस्थेत अनुभव घेतलेले तंत्रज्ञ, वैज्ञानिक व संशोधक बाहेर पडून त्यांनी या खासगी व्यवसायाला भक्कम पायावर उभे केले आहे. स्टुअर्ट ओविट, जोएल स्कॉटकीन, मायक्रोसॉफ्टचे एक भागीदार संस्थापक पॉल अॅलन, नॅथन ओकोनेक यांसारख्या अनेक नामवंतांनी या नववसाहतीच्या उभारणीस हातभार लावला आहे. डेव्हिड मॉस्टन यांच्या कंपनीने दर्जेदार अग्निबाण निर्मितीची जबाबदारी उचलली आहे.
व्हर्जिन गॅलेक्टिक, एक्सकॉर, स्पेस अॅडव्हेंचर्स, स्पेस एक्स यांसारख्या नामवंत कंपन्यांनी एकत्रितपणे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. मॉस्टन स्पेस कंपनीने टेस्ला मोटर्स, पेपाल आदी कंपन्यांच्या सहकार्याने अंतराळात प्रवास करणारी कुपी, पृथ्वी प्रदक्षिणा करून परत ये-जा करता येईल अशा प्रकारचे फेरवापराचे अग्निबाण व विमानांची निर्मिती केली आहे. केवळ चार प्रवाशांना घेऊन अंतराळ भ्रमण करता यावे यासाठी जेफ ग्रिसॉन यांची लायनक्स कंपनी धडाक्याने काम करीत आहे. पुढील पाच-सहा वर्षांत अंतराळाचा अभूतपूर्व प्रवास हौशेने करता येईल त्यासाठी अनेक प्रकारे संशोधन तर सुरू आहेच पण आर्थिक उलाढालही होत आहे. अँजेलिना जोली, ब्रॅड पीट, टॉम हँक्स, केटी पॅरी, अॅस्टॉन कुचर यांसारख्या चित्रपट तारे-तारकांनी अंतराळ प्रवासासाठी आगाऊ बुकिंग केले आहे. त्या माध्यमातून लाखो डॉलर्सची उलाढाल तर होणार आहे. अनेक धनिकांनी संशोधन कार्यातही आपले डॉलर्स ओतले आहेत. फायरस्टार टेक्नॉलॉजीज या कंपनीने अग्निबाण (रॉकेट) इंधन निर्मिती व इतर उत्पादनांची जबाबदारी उचलली आहे. सध्या हायड्राझाईन नावाचे रसायन रॉकेट उड्डाणांसाठी वापरले जाते पण ते विषारी असल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे रॉकेटसाठी कमी विषारी इंधन तयार करण्यासाठी संशोधन सुरू आहे. बर्ट रूटन यांच्या स्केल कंपोझिटर्स कंपनीने प्रत्यक्ष अंतराळ भ्रमणात वापरल्या जाणाऱ्या अंतराळ यानाची निर्मिती करण्याची जबाबदारी उचलली आहे. रूटन यांनी तयार केलेल्या व्हॉएजर यानाने १९८६ मध्ये कोणत्याही इंधनाचा फेरवापर न करता पृथ्वीभोवती वीस कि.मी अंतरावरून सातत्याने नऊ दिवस यशस्वी भ्रमण केले होते. व्यावसायिक अंतराळप्रवासाची ही स्वप्ने येत्या पाच-सहा वर्षांत पूर्ण होतील. त्यानंतर दहा वर्षांत मंगळावर पोहोचण्याची तमन्ना या मंडळींनी बाळगली आहे.
गेटवे टू स्पेस
लॉसएंजल्सपासून उत्तरेला ९० मैल दूर असलेले मोजावे हे ठकाण अंतराळ व हवाई उड्डाण केंद्र आहे. ते गेटवे टू स्पेस या नावाने प्रसिद्ध आहे.
व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीचे रीचर्ड बर्टन , स्ट्रॅटोलाँचचे पॉल अॅलेन यांचे अचाट अंतराळ प्रयोग तिथे सुरू आहेत.
धनिक जोडप्यांना यापुढे हनीमूनसाठी अंतराळात जाणे शक्य होईल. हॉलिवूडमधील ब्रॅड पीट, अँजेलिना जोली यांच्यासह अनेकांनी अंतराळ प्रवासाची तिकिटे बुक केली आहेत.
विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना मात्र शून्य गुरूत्वाच्या अनुभवासाठी मोफत अंतराळात नेले जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा