अण्णा हजारे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान सहन करण्याची शक्ती ही पाच तत्त्वे ज्यांच्याजवळ असेल तो समाजात परिवर्तन आणि देशाचा विकास करूशकतो. जन्म आणि मरणाच्यावेळी आपण काही घेऊन जात नाही, त्यामुळे समाजासाठी जे काही चांगले कार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा आणि आदर्श जीवन जगा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांंना केले.
धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विद्याथ्यार्ंशी संवाद साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. आजचा युवक हा देशाची खरी शक्ती असून तीच समाजात परिवर्तन करू शकते हे अनेकदा आंदोलनातून सिद्ध झाले आहे. युवकांमुळे अनेक देशात क्रांती झाली ते देश विकसनशील देश म्हणून ओळखली जात आहे. आपल्यामध्ये ती शक्ती आहे. मात्र, त्याचा उपयोग ज्या पद्धतीने केला पाहिजे तो केला जात नाही. जन्माला येतो त्यावेळी आपण काही घेऊन येत नाही आणि मरण येते तेव्हा काही घेऊन जात नाही. तरीही आयुष्य जगत असताना हे माझे आहे, ते तुझे आहे, तेही माझे आहे, असे करीत आयुष्यात भांडत असतो. या मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे. आपल्याला जन्म हा निष्काम सेवेसाठी मिळाला आहे ही मानसिकता ठेवून काम केले तर जीवनाचे सार्थक होते आणि काम करण्याचा आनंद मिळतो. प्रपंच करावा. मात्र, तो करताना केवळ आपल्या घरापुरता सिमित न ठेवता समाजासाठी आपण काय करू शकतो त्याचाही विचार करावा.
पाकिस्तानच्या सीमेवर असताना माझ्या देखत अनेक भारतीय सैनिक मारले गेले होते. मलाही त्यावेळी गोळी लागली. मात्र, बचावलो होतो. त्यानंतर रेल्वे स्थानकावर फिरत असताना स्वामी विवेकानंदांचे पुस्तक हाती लागल्यावर ते वाचले आणि त्या दिवसांपासून समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. आज वयाची ७७ वर्षे पूर्ण केली असली तरी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या राष्ट्राच्या विकासासाठी लढत राहणार आहे. सेवेचा आनंद हा वेगळा असतो. तो प्रत्येकाच्या जीवनात येत नाही. भ्रष्ट मार्गाने पैसा कमावणारी माणसे समाजात खूप आहे. मात्र, ती आज सुखी नाही. त्यांना सुखाने झोप घेता येत नाही. मात्र, आज मी सुखाने झोप घेऊ शकतो. माझ्याजवळ पैसा, संपत्ती काहीच नाही. जे पुरस्कारात किंवा देणगीच्या स्वरूपात मिळाले आहे ते सर्व ट्रस्ट स्थापन करून सर्व समाजसेवेसाठी दान केले आहे. आजचा युवक भरकटला असून त्यांच्याजवळ विचार नाही, असे बोलले जात असले तरी त्यात तथ्य नाही. विद्यार्थ्यांंना योग्य दिशा दिली तर त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो, हे विविध आंदोलनातून सिद्ध झाले आहे. युवकांची मोठी शक्ती आंदोलनात सहभागी झाली होती. त्यांच्यामुळे देशात काही प्रमाणात परिवर्तन करू शकलो. राज्यात दलितांच्या हत्या होत आहे. जाती धर्मामध्ये दंगली होत असताना गावांमध्ये जातीय सलोखा निर्माण करण्याचे काम विद्यार्थ्यांंनी केले पाहिजे, असे आवाहन अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांंना केले.
यावेळी प्राचार्य बबनराव तायवाडे, ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे आदी मान्यवर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा