लोकसत्ता, बहिशाल शिक्षण विभाग- मुंबई विद्यापीठ आणि नॅशनल पार्कचा संयुक्त उपक्रम
‘पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे..’ असा शब्दप्रयोग आपण नेहमी करतो पण या कुत्र्याच्या छत्र्या म्हणजेच अळंबीशी आपला फार कधी जवळून संबंध आलेला नसतो. नाही म्हणायला अलीकडे भाजी म्हणून त्याचा वापर केला जातो. पण सर्वच अळंबी या काही खाण्यालायक नसतात. त्यांची निवड जपूनच करावी लागते. कारण त्यातील अनेक विषारी असतात. पण हे ओळखायचे कसे? त्यासाठी निसर्गवाचन करावे लागते. अशी निसर्गवाचनाची एक चांगली संधी आता लोकसत्ता, बहिशाल शिक्षण विभाग- मुंबई विद्यापीठ आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने उपलब्ध करून दिली आहे सिटीवॉक निसर्गभ्रमंतीच्या निमित्ताने. पावसाळ्यात दर शनिवार- रविवारी ही निसर्गभ्रमंती होणार आहे.
निसर्गातील जैववैविध्य शास्त्रीय पद्धतीने आणि तेही आपल्या सहज सोप्या मराठमोळ्या भाषेत समजावून घेण्याची संधी या उपक्रमामध्ये मिळणार आहे. मागील सहा वर्षांंप्रमाणेच यंदाही पावसाळ्याच्या तीन महिन्यांसाठी राष्ट्रीय उद्यानात ‘सिटीवॉक निसर्गभ्रमंती’चे आयोजन करण्यात आले आहे.
पावसाळ्यातील अनेक वनस्पतींची ओळख हे या सिटीवॉकचे अनोखे वैशिष्टय़च आहे. कारण अनेक वनस्पतींचे आयुष्य हे या पावसाळ्याच्या काळापुरतेच असते. त्यातील काहींचा वापर आपण भाजी म्हणूनही करतो. पण त्यांची शास्त्रीय माहिती, वैशिष्टय़े आपल्याला माहितच नसतात. याच सिटीवॉकमध्ये आपल्या लक्षात येते की, खायची अळंबी कोणती आणि विषारी कोणती. पण केवळ वनस्पती किंवा वृक्षराजीच नव्हे तर कीटकांचे साम्राज्यही आपल्याला सामोरे येते. सोबत असतात मुंबई विद्यापीठातील बहि:शाल शिक्षण विभागातीव वनस्पतीतज्ज्ञ आणि प्राणीतज्ज्ञ. यंदाच्या या सिटीवॉकमध्येही डॉ. चंद्रकांत लट्ट ू, डॉ. राजन देसाई, डॉ. राजेंद्र शिंदे, सुशील शिंदे, प्राची गळंगे, सौरभ सावंत, आनंद पेंढाकर, श्रीकांत सावरकर, निखिल दिसोरिआ, राहुल कोळेकर, अक्षय नाचणे, राजदेव सिंग, डॉ. संजय भागवत डॉ. चंद्रकांत साळुंखे, केदार गोरे, आदित्य आकेरकर आदी तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.
सिटीवॉकसाठी येताना प्रत्येकाने आपला नाश्ता किंवा जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली सोबत आणायची आहे. त्यासाठीचे शुल्क रु. २०० असून त्यात नॅशनल पार्क प्रवेशद्वारापासून सिलोंडापर्यंतचा प्रवास आणि तज्ज्ञांचे मानधन शुल्क यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी संपर्क बहि:शाल शिक्षण विभाग, दुसरा मजला, आरोग्य केंद्र इमारत, विद्यानगरी संकुल, कालिना, मुंबई. दूरध्वनी २६५३०२६६, २६५४३०११.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा