करुया उद्याची बात
अखेर २०१३ हे वर्ष मुंबईकरांसाठी मेट्रो रेल्वे आणि मोनोरेलचे वर्ष ठरणार आहे. वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर धावणारी मेट्रो रेल्वे आणि चेंबूर-वडाळा या पहिल्या टप्प्यात धावणारी मोनोरेल मुंबईकरांसाठी पूर्व-पश्चिम भाग जोडणाऱ्या आणि वातानुकूलित गाडय़ांमधील आरामदायी प्रवासाचा आनंद देणाऱ्या ठरतील. त्याचबरोबर दक्षिण मुंबईला पूर्व उपनगरांशी जोडणाऱ्या पूर्व मुक्त मार्ग प्रकल्पामुळे वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन जलद प्रवासाचा आनंद त्यांना मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* मोनो येणार ऑगस्टमध्ये
चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौक या २० किलोमीटर लांबीच्या मार्गावर मोनोरेलचे काम सुरू आहे. पैकी चेंबूर-वडाळा हा ८.८ किलोमीटरचा पहिला टप्पा ऑगस्ट २०१३ मध्ये वाहतुकीसाठी सुरू होईल. ऑगस्टपासून चार डब्यांच्या मोनोरेलमध्ये वातानुकूलित वातावरणात अवघ्या १९ मिनिटांत हे अंतर कापता येईल. मोनोरेलची प्रवासी क्षमता ५६० असल्याने या मार्गावरील बसची वर्दळ कमी होऊन रस्ते वाहतुकीतही सुधारणा होईल.

* मेट्रोची सवारी डिसेंबरपासून
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या ११.४० किलोमीटर लांबीच्या मार्गावरील मेट्रो रेल्वेही या वर्षी सुरू होईल. मे २०१३ पर्यंत बांधकाम पूर्ण होऊन चाचण्या सुरू होतील व नोव्हेंबर-डिसेंबर २०१३ मध्ये मेट्रो रेल्वे सुरू होईल. एकावेळी ११७८ प्रवासी चार डब्यांच्या वातानुकूलित मेट्रो रेल्वेने अवघ्या २१ मिनिटांत आणि आरामात हा प्रवास होईल.

* पूर्व मुक्त मार्ग प्रकल्प
मेट्रो व मोनोच्या निमित्ताने सार्वजनिक वाहतुकीचा नवीन अध्याय मुंबई शहरात सुरू होत असताना वाहनचालकांनाही २०१३ मध्ये पूर्व मुक्त मार्ग, मिलन सबवे या प्रकल्पांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. दक्षिण मुंबईला थेट पूर्व उपनगरांशी जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेला १७ किलोमीटर लांबीचा पूर्व मुक्त मार्ग प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.

* नवे मार्ग आणि वेळेची बचत..
छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाजवळील ऑरेंज गेट ते आणिक व आणिक ते पांजरापोळ असा एकूण १४.५ किलोमीटर लांबीचा प्रमुख टप्पा एप्रिल २०१३ अखेपर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल. पांजरापोळ ते घाटकोपर या २.५ किलोमीटर लांबीच्या अंतिम टप्प्याचे काम व्हायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे मुंबईतून आणिकपर्यंत उन्नत मार्गाने व नंतर आणिक ते पांजरापोळ दरम्यान भाभा अणुसंशोधन केंद्राच्या डोंगरात बांधण्यात आलेल्या ५०० मीटर लांबीच्या भुयारी रस्त्याने वाहनचालकांना प्रवास करता येईल. त्यामुळे मुंबईहून नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या वाहनांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचेल.

* मिलन उड्डाणपूल
मिलन सबवे येथील उड्डाणपुलाचे काम मे २०१३ पर्यंत पूर्ण होत आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळय़ात पाणी साठल्याने मिलन सबवे येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास यावर्षीपासून संपेल.