निवडणुकीचा प्रचार बुधवारी रात्री संपला आणि गेल्या २० दिवसांपासून अपेक्षित असलेल्या मतदान केंद्रात जायची मतदारांची हक्काची वेळ गुरुवारी आली आहे. मतदारांच्या हक्काच्या दिवसासाठी निवडणूक आयोगाचे पनवेलचे प्रशासन सज्ज झाले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १२०० पोलिसांची कुमक घेऊन ही निवडणूक पनवेलमध्ये शांत वातावरणात पार पाडण्यासाठी ४०६ निवडणूक केंद्रांवर ३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. येथे पहिल्यांदाच ३ लाख ७० हजार ९४२ मतदारांची विक्रमी नोंद झाली आहे. १ लाख ९८ हजार ७७७ पुरुष तसेच १ लाख ७२ हजार १६५ महिला मतदार यावेळी मतदान करणार आहेत. १८ ते ३५ वयोगटातील मतदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे यावेळी ६५ ते ७० टक्के मतदान होण्याची चिन्हे आहेत.  खारघर शहरातील मतदान केंद्र क्रमांक ७२, ७८ आणि ७९ ही केंद्रे निवडणूक आयोगाने संवेदनशील ठरवली आहेत. येथे मतदान केंद्रांवर छायाचित्रीकरणाची सोय करण्यात आली आहे. ८ पेक्षा अधिक मतदान केंद्रे आहेत, अशा १४ ठिकाणी आणि मागील निवडणुकांमध्ये ज्या १२ केंद्रांवर गोंधळ आणि वाद झाले अशा ठिकाणी पोलीस उपायुक्त संजय येनपुरे आणि सहायक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.  ७१० पोलीस, २५२ होमगार्डचे रक्षक, एसआरपी आणि सीआयएसएफची प्रत्येकी एक कंपनी (९० जवान), ६७ सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, १७ पोलीस निरीक्षक यांच्यावर ४ सहायक पोलीस आयुक्त आणि १ पोलीस उपायुक्तांची देखरेख असणार आहे. प्रशासनासोबत एमआयडीसीमधील अनेक कारखान्यांनी उद्या सुट्टी जाहीर केली आहे. सरकारी बीएलओमार्फत वाटप होणाऱ्या स्लिपा अनेक मतदारांपर्यंत पोहचलेल्या नाहीत. यावेळी प्रत्येक केंद्राच्या बाहेर १०० मीटरच्या अंतरावर राजकीय पक्षांच्या टेबलसोबत काही अंतरावर सरकारी टेबलही मतदारांच्या सोयीसाठी दिसणार आहे. येथून मतदारांना आपल्या स्लिपा मिळणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी पवन चांडक यांनी दिली आहे.
उरणमध्ये २० संवदेनशील मतदान केंद्रे
उरण विधानसभा मतदारसंघामध्ये २९१ मतदान केंद्रे  असून २ लाख ४७ हजार ४८१ मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी  १८०० निवडणूक अधिकारी व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे २० मतदार केंद्रे ही संवेदनशील असल्याने या केंद्रांवर अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार नितीन चव्हाण यांनी दिली आहे.