शेतकऱ्यांमध्ये कमालीची अवस्थता निर्माण करणाऱ्या नवीन सिलिंग कायद्याबाबत घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. पूर्वीसारखेच शंभर रुपयांच्या बॉंडवर आपसी सहमतीने तहसीलदारांकडून वाटणीपत्र करून घेण्याचे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कुरूंदकर यांची खासदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी यशस्वी चर्चा होऊन उपरोक्त तोडगा काढण्यात आला.
आयुष्यभराची कमाई व कष्टाच्या पैशांवर, तसेच पिढीजात शेती वाहणाऱ्या शेतकरी कुटूंबामध्ये सिलिंग संदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना जमिनीच्या वाटणीपत्राबाबत विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत खासदार जाधव यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. महसूल अधिनियमाच्या कलम ८५/२ नुसार, तसेच सज्ञान व लग्न झालेल्या मुलांचे विभक्त रेशनकार्ड काढून वाटणीपत्र करणे विनामूल्य होत असल्याचे खासदार जाधव यांनी सांगितले.
आत्ताचे खाद्यान्न विधेयक संसदेत सादर झाले असून ते पास होणे बाकी असतांना कॉंग्रेसशासित राज्यांमध्ये त्यांची अंमलबजावणी सुरू असल्याचे खासदार जाधव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास या यंत्रणेवर नाही. म्हणून कौटुंबिक वाटणीपत्र करतांना शंभर रुपयांचा बॉंडपेपरवर करावी. कोठेही पिळवणूक होत असली तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील यावेळी खासदार जाधव यांनी केले. यावेळी आमदार विजयराज शिंदे, आमदार डॉ.संजय रायमूलकर, जिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे, दत्ता पाटील, उपजिल्हाप्रमुख शांताराम जगताप, वसंत भोजणे, जानराव देशमुख, अविनाश दळवी, सिंदुताई खेडेकर, मुन्ना बेंडवाल, धनंजय बारोटे, सुनील भाग्यवंत यांच्यासह जिल्ह्य़ातील शिवसेनेचे सर्व तालुका प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader