महाराष्ट्रातील काही शहरे व खेडेगावातील शाळा, पुस्तके, शिक्षण व परीक्षा पद्धती यांचा वेध घेणारे ‘पंतप्रधानांना पत्र’ हे अनोखे प्रदर्शन येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रातर्फे आयोजित करण्यात आले आहे.
१५ मे रोजी दुपारी तीन वाजता प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. १९ मेपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या दरम्यान गंगापूर पोलीस ठाण्यावर असलेल्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात हे प्रदर्शन होणार आहे. प्रसिद्ध रंगकर्मी संजय हळदीकर यांच्या संकल्पनेतून प्रदर्शन साकारले आहे. कोल्हापूर, नाशिक, चाळीसगाव, लोणावळा, कर्जत, पुणे रत्नागिरी, इचलकरंजी अशा विविध ठिकाणी शिबिरे घेताना शाळा, शिक्षणव्यवस्था याबद्दल काय वाटते हे पत्राने पंतप्रधानांना कळविण्याचे आवाहन त्यांनी मुलांना केले होते. मुलांनी लिहिलेली ३५० पत्रे निवडण्यात आली. या पत्रांमध्ये त्यांनी जी मते मांडली, ती सर्वासमोर यावीत हा उद्देश या प्रदर्शनामागे आहे. आजच्या शैक्षणिक पद्धतीविषयी मुलांच्या भावना किती गहिऱ्या आहेत, मुले शिक्षण प्रणालीकडे किती गांभीर्याने पाहतात हे या पत्रांमधून दिसून येते. पत्रांमधून व्यक्त झालेले प्रश्न, अस्वस्थता आणि भय यांचा विचार करता संवेदनशील माणूस अंतर्मुख होईल असा आशय आहे. आपले शिक्षण धोरण आणि वास्तव यात अंतर पडत चालले आहे.
शाळांमध्ये प्रयोगशाळांचा वापर मुलांना करू दिला जात नाही आणि प्रात्यक्षिकांसह शिकविण्यावर कमी भर आहे. हवी असलेली पुस्तके पुरेशा प्रमाणावर उपलब्ध होत नाहीत. शाळेचा परिसर अस्वच्छ आहे. शिक्षक आम्हाला समजावून घेत नाहीत, अशा बाबी मुलांनी या पत्रांमधून मांडल्या आहेत. हे  प्रदर्शन सर्वासाठी खुले आहे.