ढोल-ताशा, कच्छी बाजा, बेन्जो, नाशिकबाजा, लेझीमच्या तालावर निघणाऱ्या गणेशाच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका म्हणजे मुंबईतील गणेशोत्सवातील देशीविदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण. परंतु यंदा या आकर्षणाला महागाईचे ग्रहण लागण्याची चिन्हे आहेत. वादकांनी यंदा दर वाढविल्यामुळे अनेक मंडळांनी ‘बँडबाजा’शिवाय मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सव जवळ येऊ लागताच पुणे, सातारा येथील लेझीम पथकांचे प्रमुख मुंबईत दाखल होतात. सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपतीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांची बिदागी घेऊन आपले वेळापत्रक ठरवितात. त्यानंतर ५०-१०० जणांचा लवाजमा घेऊन लेझीम पथक मुंबईत डेरेदाखल होते ते अनंतचतुर्दशीनंतरच माघारी परतते. या पथकांतील व्यक्ती, ढोल आणि ताशाच्या संख्येवर बिदागी ठरविली जाते. २०-२५ व्यक्तींचा समावेश असलेली लेझीम पथके तासाला सात-आठ हजार रुपये घेत असत. परंतु या पथकांनी यंदा एका तासासाठी १० ते १२ हजार रुपये दर निश्चित केला आहे. मध्यम लेझीम पथकांचा दरही चांगलाच वधारला आहे. तासाला २५ ते ३० हजार रुपयांची बिदागी ते मागत आहेत. तर मोठय़ा लेझीम पथकांची बातच और आहे. ७५ ते ८० ढोल आणि शंभर ते सव्वाशे व्यक्तींचा लवाजमा असलेली ही लेझीम पथके दीड-दोन लाख रुपये बिदागी मागत आहेत. आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक लक्षवेधी व्हावी यासाठी गणेशोत्सव मंडळे मध्यम अथवा मोठय़ा पथकांना ‘सुपारी’ देत होते. परंतु यंदा दर हाताबाहेर गेल्यामुळे लेझीमला सुट्टी देण्याचा विचार मंडळे करीत आहेत.
गणेशोत्सवात कच्छी ढोल आणि सनईच्या तालावरील मिरवणुकीचा आनंद औरच असतो. कानठळ्या बसू न देता तालावर थिरकायला लावणारा कच्छी ढोल आता मात्र हळूहळू मिरवणुकांतून हद्दपार होऊ लागला आहे. नाशिकबाजा आणि बेन्जोमुळे हळूहळू कच्छी बाजा मागे पडत गेला. आजघडीला केवळ दर्दी मंडळीच मिरवणुकांमध्ये कच्छी बाजाला पसंती देतात. त्यामुळे हळूहळू कच्छी बाजा वादकांच्या बिदागीवर परिणाम झाला आहे. एकेकाळी रग्गड बिदागी मिळविणारे कच्छी बाजावादक आजघडीला तासाला दोन-अडीच हजार रुपये घेऊन मिरवणुकांमध्ये रंग भरत आहेत. लेझीमप्रमाणेच बेन्जो आणि नाशिकबाजाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. गेल्या वर्षी लहान-मोठय़ा बेन्जो पथकांच्या तालावर थिरकण्यासाठी भक्तांना अनुक्रमे दोन ते सात हजार रुपये मोजावे लागत होते. आता लहान बेन्जो पथकासाठी तीन, तर मोठय़ा बेन्जो पथकासाठी १० ते १२ हजार रुपये मोजावे लागत आहेत. नाशिकबाजाच्या दरातही गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन ते पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे. विसर्जनस्थळापर्यंत वाद्यासोबत मिरवणूक काढली तर पाच ते सहा तास सहज होतात. त्यामुळे वाद्यांमधील ही घसघशीत वाढ वाढत्या महागाईत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणे अवघड आहे. परिणामी वाद्यांशिवाज गजाननाचे नामस्मरण करीत आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढण्याचा विचार भाविक करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा