वाचनालये म्हणजे केवळ करमणुकीची साधने नाहीत, तर सुसंस्कृत राष्ट्राच्या उभारणीत वाचनालयांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अशा वाचनालयांना लोकाश्रय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. नागनाथ कोतापल्ले यांनी येथील सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यक्रमात केले. तरुण पिढी टीव्हीच्या मोहापासून दूर होत वाचनाकडे वळू लागली आहे. समाज उशीर का होईना अक्षरांच्या छायेत येत आहे. हे कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.
कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सांगता वर्षांनिमित्त साहित्य जत्रा नावाने तीन दिवसांचा महोत्सव आयोजित केला होता. यावेळी आयोजित छोटय़ा साहित्य संमेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाला साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी उपस्थित होते. एवढी र्वष वाचनालयाने अवघड परिस्थितीवर मात करून आपली यशस्वी वाटचाल चालू ठेवली ही कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार काढून या शहरात साहित्य संमेलन झाले तर अशा संस्थेच्या कामगिरीमुळे ते निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास प्रा. कोतापल्ले यांनी व्यक्त केला.
आगामी साहित्य संमेलनासाठी सात ठिकाणांहून निमंत्रणे आली आहेत. ठिकाणाची उपयुक्तता बघून याबाबत महामंडळ निर्णय घेईल. तरीही कल्याणची मागणी आग्रहाने केली जात आहे, असे वैद्य यांनी सांगितले.
ग्रंथालये ही लेखक व समाजासाठी मोठी ऊर्जा केंद्रे आहेत. वाचनामुळे माणूस समृद्ध होतो. साहित्य ही करमणुकीची बाब नसून ती एक साधना आहे, असे मत प्रा. दासू वैद्य यांनी ‘लेखक तुमच्या भेटीला’ परिसंवादात व्यक्त केले.
वाचनालयाचे जुने सदस्य एम. के. कुलकर्णी, अनुभवी कर्मचारी दीप्ती काळे यांचा सत्कार करण्यात आला. दोन दिवसांच्या उपक्रमात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना अॅड. सुरेश पटवर्धन, सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र भामरे यांनी केले.
‘सुसंस्कृत राष्ट्र उभारणीत वाचनालयांची भूमिका महत्त्वपूर्ण’
वाचनालये म्हणजे केवळ करमणुकीची साधने नाहीत, तर सुसंस्कृत राष्ट्राच्या उभारणीत वाचनालयांची भूमिका खूप महत्त्वाची आहे.
First published on: 12-02-2014 at 07:25 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Libraries had important role in cultured india