कोणतेही वाचनालय म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते पुस्तकांनी भरलेली कपाटे, पुस्तके बदलण्यासाठी आलेले वाचक आणि गाढ शांतता. माहीम सार्वजनिक वाचनालयात मात्र त्या दिवशी कलकलाट होता, गजबज होती आणि मुख्य म्हणजे पुस्तके नव्हती तर ‘उपकरणे’ होती.
शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील विज्ञानाच्या प्रयोगांचे नुसते वाचन करण्यापेक्षा ते प्रत्यक्षात करून पाहावे, त्यातून शिकावे आणि ते कृतीतही आणावे या उद्देशाने माहीम सार्वजनिक वाचनालयाने या आगळ्या विज्ञान  प्रयोग प्रात्यक्षिक आणि सादरीकरणाचे वाचनालयात आयोजन केले होते. प्रयोग करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची झालेली गर्दी आणि विज्ञानाच्या या प्रयोगात अवघे वाचनालय रंगून गेले.
पाणी शुद्धीकरण प्रकल्प, डोंगराळ प्रदेशात ऊर्जाविरहित वजनावर चालणारा रोप वे, उर्जेचे जतन आणि संवर्धन, ओझोन थराचे जतन, सेंद्रीय रोपवाटिका, नैसर्गिक स्वच्छता रसायने, नैसर्गिक प्रकाशाचा घरामध्ये केलेला वापर आदी विविध प्रयोग या वेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. ४० विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
मॉडर्न इंग्रजी विद्यालयाच्या मुलींनी रासायनिक एअर फ्रेशनरला पर्याय म्हणून निलगिरी तेल, संत्र्यापासून तयार केलेले तेल, चहापावडर, व्हिनेगर, खाण्याचा सोडा यांचा वापर प्रयोगात केला होता. या प्रयोगाला पहिला क्रमांक मिळाला. शेतीला पाणी पुरवठा करताना वीज वाचविण्यासाठी हवेच्या दाबावर चालणारा पंप तयार करणाऱ्या पार्ले टिळक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुसरा तर भाताचे तूस, चुना, कोळसा, लाकडाचा भुसा वापरून ग्रीन वूड प्रोजक्ट तयार करणाऱ्या व्ही. एन. सुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना तिसरा क्रमांक मिळाला.