नागपूर सुधार प्रन्यासने शहराच्या सर्व विभागात अतिक्रमित केलेल्या खुल्या जागांना संरक्षण दिले असून त्या ठिकाणी परिसरातील मुलांसाठी खेळाचे मदान, बगिचा आणि ग्रंथालय बांधण्यात येतील तसेच त्या ठिकाणी विविध साहित्य संपदा आणि स्पर्धा परीक्षेचे ग्रंथ ठेवून वाचन संस्कृती समृद्ध केले जाईल, असे प्रतिपादन नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे यांनी केले.
मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, विदर्भ साहित्य संघ, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, शासकीय विभागीय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने  रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृहात आयोजित नागपूर ग्रंथोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी प्रवीण दराडे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक मोहन राठोड, प्रा. मोहन चव्हाण, ग्रंथोत्सव आयोजन समितीचे सदस्य सचिव व जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, ग्रंथोत्सव आयोजन समितीचे डॉ. अनिल सारडा व्यासपीठावर उपस्थित होते.
ग्रंथोत्सव चळवळ शहराच्या झोपडपट्टी परिसरातही रुजावी म्हणून मोकळ्या केलेल्या ५४० जागेवर नागपूर सुधार प्रन्यासकडून ग्रंथालय बांधून या ग्रंथालयात ग्रंथसंपदा आणि स्पर्धा परीक्षेचे ग्रंथ ठेवल्या जातील. वाचन संस्कृती बरोबरच खेळाची संस्कृती रुजविण्यात येत आहे. त्या जागेवर शहरवासीयांसाठी वॉकिंग ट्रॅक, खेळाचे मदान विकसित केले जात आहे. हे विकसित मदान साहित्यासह परिसरातील क्रीडा मंडळांना सोपविण्यात येतील. परिसरातील ज्या नागरिकांना ग्रंथालय पाहिजे, त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
येत्या दशकात जागतिकीकरण आणि उदारीकरणामुळे साहित्य क्षेत्रात भारताचे मुख्य स्थान राहणार आहे. ६० हजार प्रकाशन संस्था इंग्रजीसह २८ भाषेत दरवर्षी १ लाख ग्रंथ प्रकाशित करीत आहेत. मोठय़ा आणि विदेशी संस्थाही भारताकडे वाचक म्हणून पाहत आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे साहित्यावर अपसंस्कृतीचे अतिक्रमण वाढत असल्याने साहित्यिकांनी त्याचा सामना करण्यासाठी सतर्क रहावे, असे आवाहनही डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले.
सेवासदन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथोत्सव स्थळापर्यंत ग्रंथ पालखी लेझीम व ढोलताशाच्या निनादात ग्रंथदिडी आणली. दिडींने नागपूरकरांचे लक्ष वेधून घेतले. स्वागत गीत गांधीबाग येथील आदर्श विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी गायिले. प्रास्ताविक मेघा जाधव यांनी केले. संचालन सहायक संचालक शैलजा दांदळे-वाघ यांनी केले. आभार र.चं. नलावडे यांनी मानले.
मराठी भाषा दिनानिमित्त उद्या, गुरुवारी दुपारी १२ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली केले आहे. विचारवंत डॉ. हरी नरके, साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके, प्रा. मोहन चव्हाण हे प्रमुख वक्ते आपले विचार मांडतील. सायंकाळी ७ वाजता जॉनी मेश्राम, विनोद इंगळे यांच्या पथकाचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा