चुकीच्या शिक्षण पद्धतीमुळे सध्याचा समाज भरकटत चालला आहे. उपेक्षितांबद्दलच्या संवेदनाच समाज हरवून बसला आहे. आता जगावे कसे याचेच शिक्षण देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. अनिल अवचट यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक मंचच्या (सावेडी) वतीने डॉ. अवचट यांना गुरुवारी सायंकाळी पाइपलाइन रस्त्यावरील मोरया मंगल कार्यालयातील समारंभात ‘ज्ञानविज्ञान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. मंचचे अध्यक्ष सर्वोत्तम क्षीरसागर यांच्या हस्ते रोख रक्कम, महावस्त्र, गौरवचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ या स्वरूपातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षीरसागर होते.
माणूस कसा संवेदना हरवत चालला आहे, याची विविध उदाहरणे डॉ. अवचट यांनी सांगितली. मरणानंतर अश्रू ढाळला जाणार नसेल तर ते जीवन काय उपयोगी, उन्हात फिरणारी उघडीनागडी छोटी मुले, उद्याचे भावी नागरिक पाहिल्यावर वेदना झाल्याच पाहिजेत. दुस-याचे दु:ख जाणून घ्या, माणसातील देव ओळखा हेच संतांनी सांगितले, तेच आपले धन आहे. माणूसपण टिकवणे महत्त्वाचे आहे, परंतु सध्या सर्वच लोक पैशाच्या मागे धावत आहेत, लहान मुलांची मनेही स्पर्धेने व्यापून टाकली आहेत, त्यांच्या मनात कुतूहल निर्माण होण्याच्या काळात त्यांना जीवघेण्या स्पर्धेसाठी पाठवले जाते, योगासारख्या गोष्टीलाही आपण कमर्शिअल करून टाकलंय, यातून समाजात विस्कळीतपणा आला आहे. माणसातील उपजत गुणांना महत्त्व राहिले नाही. म्हणूनच संतांनी साधी राहणी व साधे जीवन याला महत्त्व दिले, असे अवचट म्हणाले.
 बलभीम पांडव यांनी स्वागत केले. ज्योती केसकर यांनी परिचय करून दिला. अपर्णा बाल्टे यांनी पसायदान म्हटले. सूत्रसंचालन वृषाली पोंदे यांनी केले. माधवी कुलकर्णी यांनी आभार मानले.

Story img Loader