दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांनी ‘टिंग्या’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले. ‘टिंग्या’ चित्रपटाला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यानंतर आता तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर त्यांचा ‘देख इंडियन सर्कस’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘टिंग्या’ चित्रपटानंतर आतापर्यंतच्या प्रवासाविषयी, त्यांच्या नव्या सिनेमाविषयी आणि जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाविषयी मंगेश हाडवळे यांनी ‘रविवार वृत्तान्त’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
‘टिंग्या’ चित्रपट गाजल्यानंतर दुसरा चित्रपट लगेच का केला नाहीत?
‘टिंग्या’ चित्रपट केल्यानंतर लगेच हातात कथा-पटकथा नव्हती. कारण, तसा काही विचारच केलेला नव्हता. ‘टिंग्या’च्या यशानंतर आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. आयुष्य विभागले गेले. फिल्म सोसायटीच्या कार्यक्रमांना जाणे, कॉलेजमध्ये परीक्षक म्हणून जाणे, मुलाखती देणे, चित्रपट महोत्सवांना जाणे असे काहीसे चालले होते. त्यामुळे पहिल्या चित्रपटानंतर लगेच चित्रपट केला नाही.
‘टिंग्या’नंतर दुसरा मराठी चित्रपट करण्यासाठी विचारणा झाली असेल ना?
हो. मराठी चित्रपट करण्यासाठी फारशी विचारणा झाली नाही. परंतु, हिंदी चित्रपटसृष्टीतून अनेक निर्मात्यांकडून विचारणा झाली. अगदी यूटीव्हीपासून ते अनेक मोठय़ा हिंदी बॅनर्सकडून विचारणा झाली. फक्त एकाच मराठी चित्रपट निर्मात्याकडून ऑफर आली. परंतु, त्या निर्मात्यांना ‘टिंग्या’चा विषय पचला नसावा.
मग असे असूनही बडय़ा बॅनरच्या ऑफर्स का स्वीकारल्या नाहीत?
अगदी १५-१६ निर्मात्यांकडून ऑफर्स असूनही तेव्हा स्वीकारल्या नाहीत. कारण ‘टिंग्या’नंतर लगेच दुसऱ्या सिनेमाचा विचार करीत नव्हतो.
आता चार वर्षांनंतर तुमचा चित्रपट येतोय. मधल्या काळात नवीन काय केले?
‘टिंग्या’च्या यशाने अधिक लोकांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलो. त्यामुळे कक्षा रुंदावल्या. परंतु, दरम्यानच्या काळात अॅड फिल्म्सचे दालन माझ्यासाठी खुले झाले. ‘बायर अॅण्ड बायर केमिकल’ कंपनी असो की ‘मायको सीड्स’, ‘आयसीआयसीआय बँक’ अशा अनेक कॉपरेरेट कंपन्यांच्या जाहिराती केल्या. जाहिरात क्षेत्र हे माझ्यासाठी अगदी नवे दालन होते. आणि ‘टिंग्या’च्या यशानंतर ते माझ्यासाठी खुले झाले हे विशेष.
दिग्दर्शक असूनही व्यवसायाकडे कसे वळलात?
लहान भाऊ मनोज याने हॉर्टिकल्चरमध्ये एम.एस्सी. केले आहे. तो बँकेत नोकरी करीत होता. परंतु, माझी आणि त्याची कल्पनाशक्ती आणि व्यवसाय सांभाळण्याचे त्याचे कौशल्य यामुळे आम्ही आमच्या गावी जुन्नर तालुक्यात कृषी पर्यटन केंद्र सुरू करून व्यवसायात उडी घेतली.
हाच व्यवसाय का निवडला?
हॉर्टिकल्चरमध्ये भाऊ असल्यामुळे हा व्यवसाय निवडला. तसेच त्यामागे आपली नाळ आपल्या गावाशी, तिथल्या मातीशी जुळलेली राहावी. आपली संस्कृती टिकवून ठेवता यावी हा विचारही खास होता. ऊस-द्राक्ष, पोल्ट्री व्यवसाय होताच. त्याचबरोबर जुन्नर हा तालुका अगदी ब्रिटिश काळापासून चांगल्या हवेसाठी प्रसिद्ध आहे. दम्याचे रुग्ण येथे येऊन राहिले तर आजारातून बरे होतात. असे उत्तम नैसर्गिक हवामान, तसेच चौल राज्यकर्त्यांची राजधानी म्हणून तिसऱ्या शतकापासूनचा जुन्नरला इतिहास आहे. त्याची जपणूक आपल्या कामातून करता येईल म्हणून हा व्यवसाय निवडला.
हिंदी सिनेमा करण्याचा निर्णय का घेतला?
हिंदी सिनेमा करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘टिंग्या’ला यश मिळाल्यानंतर, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या माध्यमातून जगभरातील लोकांपर्यंत पोहोचलो, तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही पोहोचलो. हिंदी निर्मात्यांच्या ऑफर्स मिळत होत्या. तेव्हा जाणवले की आपल्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर हिंदी सिनेमा करायला हवा.
मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट बनविताना त्यात मुख्य फरक काय जाणवतो?
चित्रपट बनविण्याच्या प्रक्रियेत काहीच फरक नाही. परंतु, हिंदी चित्रपटाचे अवकाश, आवाका सगळेच मोठे आहे. त्यामुळे हिंदीत बजेटचा विचार करताना गुणवत्ता खूप सांभाळावी लागते. मुख्य फरक आहे तो दोन्ही चित्रपटांच्या प्रेक्षकांचा आहे असे वाटते. हिंदी सिनेमाचा प्रेक्षक संख्येने तर खूप आहेच परंतु, त्याच्यासमोर पर्याय खूप आहेत. त्यामुळे त्याला चित्रपटगृहात खेचून आणण्यासाठी गुणवत्तापूर्ण, सशक्त सिनेमा केलाच पाहिजे.
मराठी-हिंदी चित्रपटांच्या बजेटचा फरक काय जाणवला?
बजेट हा मुख्य फरक आहे. ‘टिंग्या’ चित्रपटाचे बजेट कमी होते. प्रत्येक गोष्ट बजेट कमी असल्यामुळे त्यानुसार करावी लागली. परंतु, हिंदीमध्ये बजेट चांगले असते. त्यामुळे तुमच्या मनातला चित्रपट साकारण्याचा विचार शक्य होतो. मराठी-हिंदीची तुलना बजेटच्या बाबतीत होऊ शकत नाही. कारण दोन्हींचे अवकाश निरनिराळे आहे.
‘देख इंडियन सर्कस’ चित्रपटाची संकल्पना काय?
हा विडंबनात्मक चित्रपट आहे. सर्कस पाहायला जाण्यासाठी लागणारे तिकीट, त्याचा खर्च यासाठी एक राजस्थानी कुटूंब झगडतेय आणि त्याच वेळी निवडणुकीचे तिकीट घेण्यासाठी खासदार झगडतोय. निवडणूक, लोकशाही आणि सर्वसामान्य माणूस यांच्यातील दरी, विसंगती यावर भाष्य करण्याचा प्रयत्न विडंबनातून विनोदी पद्धतीने केला आहे.
‘देख इंडियन सर्कस’ची निर्मितीपूर्व कोणती तयारी करावी लागली?
राजस्थानात घडणारे कथानक लिहून होईपर्यंत राजस्थान मी पाहिले नव्हते. पटकथा झाल्यावर दोन महिने राहून राजस्थान पाहिले. चित्रीकरणासाठी जागा निवडल्या. मुख्य म्हणजे दोन लहान मुले मुख्य भूमिकेत असल्यामुळे राजस्थानातील मुलांची निवड करण्याची प्रक्रिया करावी लागली. जवळपास १२ हजार मुलांच्या ऑडिशन्स घेऊन दोघांची निवड केली. २०१० च्या डिसेंबरमध्ये दोन महिने राजस्थानात जाऊन राहिलो आणि कलावंतांची ‘लूक टेस्ट’ तसेच सिनेमाची ‘लूक टेस्ट’ केली. जानेवारी २०११ मध्ये चित्रीकरण सुरू केले.
या चित्रपटाचे बजेट किती होते?
या चित्रपटाचे बजेट जवळपास ६ कोटी होते.
चित्रपटाचे निर्माते-तंत्रज्ञ-कलावंत यांच्याविषयी..
महावीर जैन, चिराग शहा, अनिल लाड हे प्रमुख निर्माते आहेत. त्याशिवाय इम्तियाज अली हे आमच्या सिनेमाचे ‘प्रेझेंटर’ आहेत. अभिनेता विवेक ओबेरॉय हेही निर्माते आहेत. जैन यांचे मित्र म्हणून ते या सिनेमात आले. चित्रपटाचा दर्जा उंचावण्यासाठी जवळपास सर्व तंत्रज्ञ मुख्य प्रवाहातील हिंदूी सिनेमा करणारे आहेत. संगीतकार शंकर-एहसान-लॉय आहेत, छायालेखन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले आहे. कला दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा यापासून ते चित्रपटाचे सर्व तंत्रज्ञ हिंदी सिनेमात काम करणारेच आहेत.
आपला भारतीय चित्रपट ऑस्करला कसा जाऊ शकतो?
ऑस्करच्या विविध नामांकनांमध्ये विदेशी ऑस्करसाठी आपल्या चित्रपटाचा विचार केला जातो. परंतु, तुमच्या सिनेमाच्या निर्मात्यांमध्ये सहनिर्माता म्हणून अमेरिकेतील कंपनी किंवा लोक असले तर ऑस्करच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्येही तुमचा चित्रपट पाठविता येऊ शकतो.
आतापर्यंतच्या यशाचे श्रेय कुणाला द्याल?
‘टिंग्या’पूर्वी रेल्वेचा पास काढण्यासाठी मी अनेकदा रक्त विकले आहे. परंतु, आता माझ्याकडे गाडी आहे. ‘टिंग्या’ची गोष्ट जवळपास ४१ निर्मात्यांनी ऐकवली होती. तेव्हा त्यासाठी अनेकदा पायपीट केली, पण चिकाटी सोडली नाही. याचे सगळे श्रेय मी माझ्या वडिलांनाच देतो. त्यांचा जगण्याचा दृष्टिकोन त्यांनी मला दिला, माझ्या भावांनाही दिला. जे काही करायचे ते उत्तमच करायचे, ठरविले ते करण्यासाठी वाट्टेल ती मेहनत करायची, पण मागे हटायचे नाही. ज्या क्षेत्रात काम करू त्या क्षेत्रात निष्णात व्हायचे हा त्यांचा विचार त्यांनी मला दिला. केवळ विचार दिला नव्हे तर त्या पद्धतीने कृती करण्याची धमक दिली.
अलीकडे प्रदर्शित झालेले तुमचे आवडते चित्रपट कोणते?
‘देऊळ’, ‘रावडी राठोड’, ‘जिदंगी ना मिलेगी दोबारा’, ‘काकस्पर्श’, ‘पानसिंग तोमर’, ‘लाइफ ऑफ पाय’…
तुमचा ‘वीकपॉइंट’ काय आहे असे वाटते?
वेगवेगळ्या पद्धतींचे जेवण मला खूप आवडते. आपण ठरवले आहे तसे होत नसेल तर त्यासाठी टोकाला जाणे ‘एक्स्ट्रीम परफेक्शनिस्ट’ असणे हे माझे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे ‘वीकपॉइंट’ म्हणता येतील.
‘टिंग्या’नंतर आयुष्य बदलले
दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांनी ‘टिंग्या’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले. ‘टिंग्या’ चित्रपटाला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यानंतर आता तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर त्यांचा ‘देख इंडियन सर्कस’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहे.
आणखी वाचा
First published on: 23-12-2012 at 01:04 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life has changed after tingya