दारू पिऊन घरात किरकोळ कारणावरून भांडण काढून पत्नीचा जाळून खून केल्याबद्दल बाळासाहेब शंकरराव गलगले (वय ४२, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) यास जिल्हा सत्र न्यायाधीश सुमंत कोल्हे यांनी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.
मृत नागूबाई (वय ३५) ही आरोपी बाळासाहेब गलगले याची पत्नी होती. बाळासाहेब यास दारूचे व्यसन होते. त्यांना मुलगी अश्विनी (वय १३) व मुलगा प्रकाश (वय ८) अशी मुले असून नवरा-बायको मोलमजुरी करून प्रपंच भागवित होते. नवरा बाळासाहेब सतत दारू पिऊन व किरकोळ कारणावरून पत्नी नागूबाई हिला मारझोड करीत असे. १० सप्टेंबर २०१२ रोजी रात्री उशिरा दारू पिऊन बाळासाहेब घरी आला व जेवण वाढ म्हणून विनाकारण आरडाओरडा करून पत्नीला शिवीगाळ करू लागला. त्या वेळी वैतागलेल्या नागूबाई हिने, माझे नशीबच वाईट असे रडत बडबड करीत असताना नवरा बाळासाहेब याने घरातील रॉकेल तिच्या अंगावर ओतले व लगेचच काडेपेटीने काडी ओढून पेटवून दिले. यात ती गंभीर भाजून जखमी झाली. तिच्या ओरडण्याने घरात झोपलेली मुले जागी झाली व शेजारच्या मंडळींनी धाव घेऊन मदतकार्य केले. आरोपी बाळासाहेब पळून गेला. सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना अखेर नागूबाईने प्राण सोडला. याप्रकरणी बाळासाहेब याच्याविरूध्द मंद्रूप पोलिसानी गुन्हा दाखल करून तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात आरोपीची मुलगी अश्विनी हिने न्यायालयात साक्ष देताना वडिलांनी आईस मारहाण करून पेटवून दिल्याचे स्पष्टपणे सांगितले. आरोपी म्हणून वडील आहेत का, अशी विचारणा केली असता तिने वडिलांकडे पाहण्यासही नकार दिला. या खटल्यातील बहुतांश पुरावा हा आरोपी कारागृहात असल्याने व त्यास न्यायालयात हजर करता न आल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सप्रणालीचा वापार करून नोंदविण्यात आला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे यांनी मृत नागूबाई हिने दिलेला मृत्युपूर्व जबाब ग्राह्य़ धरण्याबाबत मुलगी अश्विनी हिने दिलेली साक्ष विश्वासार्ह असल्याबाबतचा युक्तिवाद केला. तो न्यायालयाने ग्राह्य़ धरून आरोपीला दोषी धरले. आरोपीतर्फे अ‍ॅड.राजेंद्रसिंह बायस यांनी बचाव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा