मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या खटल्यात सोलापूरच्या सत्र न्यायालयाने एका आरोपीला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने अपिलात रद्दबातल ठरविली.
सोहाळे येथे सुभद्राबाई भागवत बाबर (४२) व निवृत्ती बाबा जगताप (५२) यांचा खून केल्याबद्दल राजाराम ऊर्फ राजू लिंबाजी बाबर (५०) यास सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा फर्मावली होती. मृत सुभद्राबाई व निवृत्ती जगताप यांच्यात अनैतिक संबंध होते. शेतीचा पाणी पुरवठा करणाऱ्यासाठी पाईपलाईन घालण्यावरून आरोपी राजाराम बाबर व दादाराव बाबर यांचे सुभद्राबाई हिच्याबरोबर भांडण झाले होते. याच कारणावरून १३ सप्टेंबर २००४ रोजी पहाटेच्या सुमारास सुभद्राबाई व निवृत्ती यांचा खून झाला. या खटल्यात आरोपी राजाराम बाबर यास ३१ ऑगस्ट २००५ रोजी शिक्षा सुनावण्यात आली असता त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते.
न्या. पी. व्ही. हरदास व न्या. गडकरी यांच्या खडपीठासमोर या अपिलावर सुनावणी झाली. या खटल्यातील श्वानपथकाचा पुरावा विश्वासार्ह नाही. आरोपीकडून जप्त केलेल्या रक्ताळलेल्या कपडय़ांवर व फरशी कुऱ्हाडीवर लाखी सील नाही. तसेच खून करण्याचा हेतू सरकार पक्षाला सिद्ध करता आला नाही, अशा हरकती आरोपीचे वकील मिलिंद थोबडे यांनी घेत केलेला युक्तिवाद खंडपीठाने मान्य केला व आरोपीची जन्मठेप रद्दबातल ठरविली. अॅड. थोबडे यांना अॅड. रितेश थोबडे, अॅड. प्रियल सारडा, अॅड.राजकुमार म्हात्रे यांनी साह्य़ केले. सरकारतर्फे अॅड. देढिया यांनी बाजू मांडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा