अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा सूड उगवण्यासाठी तिचा खून करणाऱ्या सचिन जालिंदर चव्हाण (वय ३०, रा. पवळवाडी, पाथर्डी) या तरुणास जन्मठेपेची, तर मृत महिलेच्या अंगावरील दागिन्यांचा बेकायदा वापर केल्याच्या आरोपावरून सचिनचा भाऊ बाबासाहेब चव्हाण यास एक वर्षे कैदेची शिक्षा न्यायालयाने दिली.
जिल्हा सत्र न्यायाधीस ए. झेड. ख्वाजा यांनी या खटल्याचा निकाल आज दिला. घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, परंतु परिस्थितिजन्य पुरावा ग्राहय़ मानून न्यायालयाने दोघांना शिक्षा दिली. सरकारतर्फे सरकारी वकील गोरक्ष मुसळे यांनी काम पाहिले.
घाटशिरस (ता. पाथर्डी) येथील संजय सुखदेव वारे यांच्या शेतावर सचिन काम करत होता. त्याने वारे यांच्या पत्नीचा विनयभंग केल्याने, पत्नीने त्याला चपलेने मारले होते. नंतर तो तिच्याकडे अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी करू लागला. संक्रांतीचा बाजार आणण्यासाठी निघालेल्या वैशाली संजय वारे हिला बनाव करून मोटारसायकलवरून वृद्धेश्वरच्या घाटात आणले. तेथे त्याने व बाबासाहेब या दोघांनी तिच्या डोक्यात दगड घालून खून केला व मृतदेह घाटात टाकून दिला. ही घटना ८ ते १६ जानेवारी २०१३ दरम्यान घडली. संजय वारे यांनी पोलिसांकडे पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. या घटनेनंतर सचिन व बाबासाहेब हे दोघे नेप्ती (ता. नगर) एका वीटभट्टीवर काम करत होते. तेथून सचिन वारंवार वारे यांना मोबाइल करून वैशालीची चौकशी करत होता. त्यामुळे वारे यांनी संशयावरून पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक आमले यांनी केलेल्या तपासात दोघांनी खून केल्याचे निष्पन्न झाले. दोघांच्या घरातून वारे यांचा मोबाइल, वैशालीच्या अंगावरील दागिने, रक्ताने भरलेले कपडे जप्त करण्यात आले. दरीत पडलेला वैशालीचा मृतदेहही वारे यांनी साडी, चपला व बांगडय़ांवरून ओळखला.

Story img Loader