मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या बऱ्याच महिला या हल्ल्याला चार वष्रे उलटली तरी अद्याप त्या दु:खातून सावरलेल्या नाहीत. किंबहुना परिस्थितीने त्यांना त्यातून सावरूच दिलेले नाही. पतीच्या अचानक निधनानंतर एकाकी पडलेल्या या विधवांची संसाराचा गाडा कसाबसा खेचताना अक्षरश: फरफट होत आहे. अन्य कुटुंबीयांनी केलेली लूट, फसवणूक यामुळे या विधवा आर्थिक आणि आरोग्य अशा दोन्ही पातळीवर खचून गेल्या आहेत. ही बाब टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टीस) केलेल्या चार वर्षांच्या अभ्यासातून उघड झाली आहे.
३५ पकी १४ विधवांना विविध आराजांनी ग्रासले आहे. पतीच्या अकाली निधनाने या महिला हादरून गेल्या होत्या. परंतु नंतर मुलं आणि कुटुंबाच्या जबाबदारीच्या जाणिवेने त्या उभ्या राहिल्या. त्या आशावादीही होत्या. मात्र जसजसे दिवस सरत गेले, तसतशी जगण्यासाठी होणारी फरफट, पशांच्या लालसेने कुटुंबाने केलेली दगाबाजी, त्यामुळे तुटपुंज्या कमाईतून स्वत:चे आणि मुलांचे पोट भरण्यासाठी झालेल्या फरफटीने त्या स्वत:च तणावाच्या खाईत लोटल्या गेल्या.
तरुण विधवांना मोठय़ा प्रमाणात शोषणाला सामोरे जावे लागत असल्याचे या अभ्यासातून पुढे आले आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ११ जणींचे पती कायमस्वरूपी नोकरीला होते, १४ विधवांचे पती कुशल वा निमकुशल कामगार होते. उर्वरित मात्र रोजंदारी करीत होते. हल्ल्यापूर्वी काही विधवा नोकरी करीत नव्हत्या. परंतु हल्ल्यानंतर त्यांना बऱ्याच नोकऱ्या देऊ करण्यात आल्या. ३५ पकी आठजणींनीच नोकऱ्या स्वीकारल्या. काहींनी ही संधी गमावली, तर काहींना नोकरी दीर वा कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला देण्यासाठी कुटुंबाकडून दबाव  टाकण्यात आला.
हल्ल्यानंतर जवळपास सर्वच विधवांना नुकसानभरपाई म्हणून मोठी रक्कम मिळाली. परंतु त्यातील काहीजणींना त्या रक्कमेचे कुटुंबात वाटप करण्यासाठी दबाव घालण्यात आला. काहींना घराची पुनर्बाधणीसाठी पसे देण्यास सांगितले गेले, विशेष म्हणजे या घरांवर या विधवा कुठलाही कायदेशीर हक्क सांगू शकत नव्हत्या. परंतु त्यांना अशाप्रकारे कुटुंबियांनी लुटले. त्यामुळे आज या विधवा सगळ्याच बाजूने हालाखीत जीवन जगत आहेत. ‘टीस्स’तर्फे या महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचा, त्यांना नोकरी मिळवून देण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला जात आहे.
संस्थेने तीन गटांमध्ये हा अभ्यास केला. त्यात त्यांची मुले अद्याप शाळेची पायरी चढायची आहेत, अशा विधवांचा एक गट आहे. दुसऱ्या गटात मुलं शाळेत जात आहेत आणि तिसऱ्या गटात मुले बऱ्यापकी मोठी आहेत. तिसऱ्या गटात अवघ्या पाचच महिला आहेत, तर पहिल्या गटातील १६ व दुसऱ्या गटातील महिलांची संख्या १४ आहे. यामध्ये १७ जणी महाराष्ट्रातील, ८ उत्तर प्रदेशातील, ७ बिहारमधील आणि झारखंड तसेच केरळमधील प्रत्येकी एकीचा समावेश होता. २१ पकी १३ िहदू, तर १४ मुस्लिम विधवांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. आठजणीच दहावी वा त्यापेक्षा जास्त शिकल्या आहेत, तर १४ जणी अशिक्षित आहेत.