बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळणे आणि अभिनेत्री म्हणून सातत्याने वेगवेगळी आव्हाने पेलून टिकून राहणे ही खूप अवघड गोष्ट आहे. अभिनेत्रीचे आयुष्य अजिबात सहजसोपे नसते. खरे म्हणजे बॉलीवूड खूपच क्रूर आहे, असे निरीक्षण अभिनेत्री बिपाशा बासू हिने व्यक्त केले आहे.
सात वर्षांपासून साधारणपणे दरवर्षी तीन चित्रपट आपण करीत आहोत. जेव्हा एखाद्या चित्रपटाच्या टीमचे परिचित वातावरण, परिचित लोक आजूबाजूला नसतात, अपरिचित वातावरण असते तेव्हा मी चांगला अभिनय करू शकते. थोडेसे असुरक्षित वाटत असेल तेव्हा माझा अभिनय चांगला होतो असे माझे स्वत:चे मत आहे, असे बिपाशाचे म्हणणे आहे.
खलनायकी छटेच्या भूमिका असोत किंवा अन्य भूमिका असोत, अशा भूमिका स्वीकारण्याचा धोका मी पत्करला आहे. खलनायकी छटेच्या भूमिकांमुळे तुमची एक सशक्त प्रतिमा उभी राहते. अर्थात याचे आजच्या प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावरचे कलावंतांचे आयुष्य आणि त्यांचे वास्तवातील आयुष्य यातला फरक अतिशय चांगल्या प्रकारे समजतो याची मला खात्री आहे, असे बिपाशा म्हणाली. विक्रम भट यांच्या ‘क्रिएचर’ या थ्रीडी चित्रपटाबरोबर अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकीसोबत बिपाशा बासू ‘आत्मा’ या चित्रपटातून अभिनय करीत आहे.