कलाक्षेत्रातील अमूल्य अशा योगदानाबद्दल शासनातर्फे आयोजित ‘सप्तरंग’ महोत्सवात ज्येष्ठ कलावंत अरविंद पिळगावकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी आत्माराम भेंडे यांना शासनातर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बुधवारी ठाणे येथे आयोजित ‘सप्तरंग’ महोत्सवात ज्येष्ठ कलावंत अरविंद पिळगावकर यांचा ‘अण्णासाहेब किलरेस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारा’ने तर ज्येष्ठ रंगकर्मी आत्माराम भेंडे यांचा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात हा सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा झाला. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवताळे यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
आज आयुष्यात मागे पाहताना अनेक आठवणींनी गहिवरून येते, असे अरविंद पिळगावकर यांनी या वेळी बोलताना सांगितले. महापालिका शाळेतील शिक्षणापासून ते विल्सन कॉलेजमध्ये असताना गाणे शिकण्यास सुरुवात करेपर्यंतचा प्रवास त्यांनी या वेळी उलगडला. आजच्या पेक्षा त्या काळातील महापालिका शाळांचा दर्जा अतिशय चांगला होता, असेही त्यांनी सांगितले. आयुष्यात आधार मिळालेल्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त न करणे हा कृतघ्नपणा असल्याचे सांगून त्यांनी आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आयुष्यातील परमेश्वराचे दुसरे रूप हे आईचे होते, असे त्यांनी सांगितले. संगीत आणि नाटकाने आपल्या आयुष्याचे सार्थक झाले. तसेच ‘संगीत-नाटकावर’ अत्यंत प्रेम असल्यानेच आपण गद्य नाटकाकडे वळलो नाही असे त्यांनी सांगितले. आजच्या काळात नाटय़संगीताची लोकप्रियता कमी झाली असल्याची खंत व्यक्त करून तरुणांना या क्षेत्राकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच नाटय़संगीताची परंपरा टिकवण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी आत्माराम भेंडे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. प्रभाकर पणशीकर यांच्या नावाने पुरस्कार मिळत असल्याबद्दल अतिशय आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘थांबला तो संपला’ ही म्हण आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला लागू होत असल्याने मराठी रंगभूमीसाठी कायम झटत राहिलो, असे त्यांनी सांगितले. आजही रंगभूमीवर करण्यासारख्या अनेक गोष्टी शिल्लक असून तरुण पिढी या गोष्टी नक्कीच पूर्ण करील, असा विश्वास त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवताळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

Story img Loader