येरवडा कारागृहात गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा कार्यक्रम सुरू असतानाच मंगळवारी सकाळी तेथील खुल्या कारागृहातून एक कैदी पळून गेला. हा कैदी जन्मठेपेची सजा भोगत होता. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या कैद्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश बाजीराव दसपुते (वय ४०, रा. मुंगी, ता. शेवगाव, जिल्हा- अहमदनगर) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. दसपुते याच्यावर १९९८ साली खुनाचा गुन्हा दाखल होता. त्याला या गुन्ह्य़ात जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. त्याला २००२ साली येरवडा कारागृहात दाखल करण्यात आले होते. त्याची चांगली वर्तणूक पाहून त्याची साडेतीन वर्षे शिक्षा माफ करण्यात आली होती. २० नोव्हेंबरपासून त्याची रवानगी खुल्या कारागृहात करण्यात आली होती. त्याची शिक्षा एक ते दोन वर्षे संपणार होती. येरवडा येथील खुल्या कारागृहात सध्या एकूण ११८ कैदी आहेत. सोमवारी सकाळी साडेसात वाजता येरवडा कारागृहाचे पोलीस हवालदार बाळासाहेब पुंड यांनी नेहमी प्रमाणे कैद्यांना मोजून त्यांना कामे ठरवून दिली व गस्त घालण्यासाठी निघून गेले.
दुपारी साडेबाराच्या सुमारास खुल्या कारागृहाती कैद्याची मोजणी सुरू असताना एक कैदी कमी असल्याचे आढळून आले. त्यांनी तुरुंग अधिकारी कापरे यांना ताडतीने कळविले. त्याचा येरवडा कारागृहाच्या परिसरात शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. त्यामुळे येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बोरगे या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने खुल्या कारागृहातून पलायन केले होते. कल्याण न्यायालयाने त्याला त्याच्या पत्नीचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर मे २०११ मध्ये पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी सलीम गुलाब पठाण याने खुल्या कारागृहातून पलायन केले होते.