पळता पळता तो अचानक विहिरीत पडला. जीव वाचविण्याची धडपड करीत असताना विद्युत पंपाच्या पाईपच्या आधार मिळाला. कडाक्याची थंडी आणि रात्रभर गारेगार पाण्यात राहून त्याला अक्षरश: हुडहुडी भरली. दैव बलवत्तर म्हणूनच तो वाचला आणि आज सकाळी ग्रामस्थांच्या सहकार्याने विहिरीबाहेर आला.
तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे एका बिबटय़ावर हा बाका प्रसंग गुदरला. भक्ष्याच्या शोधात मंगळवारी रात्री गावात आलेला बिबटय़ा अचानक रात्री साडेआठच्या सुमारास शेतकरी कैलास भानुदास गडाख यांच्या मालकीच्या दोन परस खोल विहिरीत पडला. जवळपास दीड परस खोलवर पाणी असल्याने बिबटय़ाच्या वाचण्याची शक्यता मावळली होती, मात्र केवळ दैव बलवत्तर असल्यानेच त्याला एका विद्युत पंपाच्या पाईपचा आधार मिळाला. त्या आधारावर त्याने संपूर्ण रात्र काढली, पण सकाळी त्याला थेट वन विभागाच्या िपजऱ्यात जेरबंद व्हावे लागले.
सकाळी विहिरीवर आलेल्या कैलास गडाख यांना पाईपजवळ बिबटय़ाचे डोळे चकाकले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता पाण्यात एका विद्युत पाईपच्या साहाय्याने त्याला घट्ट पकडलेल्या अवस्थेत व केवळ डोकेच बाहेर असलेल्या स्थितीत बिबटय़ा पाहून त्यांनी तातडीने गावातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पावसे यांना माहिती दिली. त्यांनी तो जिवंत आहे याची खात्री करून घेतली. तातडीने ही माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली. वन खात्याचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी जवळूनच एक लाकडी बाज मागविली आणि बिबटय़ासाठी ती विहिरीत सोडली. रात्रभर थंडीने गारठलेला बिबटय़ा बाजेचा आधार मिळताच लगेच बाजेवर विसावला. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी िपजरा मागवत तो विहिरीत बाजेजवळ सोडला. जीवदान मिळत असल्याचे दिसताच बिबटय़ानेही क्षणाचा विलंब न करता िपजऱ्यात धाव घेतली आणि तो जेरबंद झाला. बिबटय़ाला वाचविण्याचा हा प्रयत्न जवळपास तीन तास सुरु होता. िपजऱ्यात जेरबंद झालेल्या बिबटय़ाला वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी नर्सरीत आणले.
विहिरीत गारठलेल्या बिबटय़ाला जीवदान
पळता पळता तो अचानक विहिरीत पडला. जीव वाचविण्याची धडपड करीत असताना विद्युत पंपाच्या पाईपच्या आधार मिळाला. कडाक्याची थंडी आणि रात्रभर गारेगार पाण्यात राहून त्याला अक्षरश: हुडहुडी भरली. दैव बलवत्तर म्हणूनच तो वाचला आणि आज सकाळी ग्रामस्थांच्या सहकार्याने विहिरीबाहेर आला. तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे एका बिबटय़ावर हा बाका प्रसंग गुदरला.
First published on: 10-01-2013 at 03:17 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life to leopard who struct in well