नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्य़ांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोलीत तर पिकांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ९१ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या वेळी पावसाळ्यात तब्बल ७६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारदरबारी आहे. यातील ४५ मृत्यू वीज पडून झाले आहे. २१ जण पुरात वाहून, तर ५ जणांचा मृत्यू दरड कोसळून झाला आहे.
नांदेड जिल्ह्य़ात पावसामुळे सर्वाधिक २५ जणांचा मृत्यू झाला, तर बीडमध्ये वीज पडून मृत्यू झालेल्यांची संख्या १२ आहे. तब्बल १२ कोटी ५८ लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यात काही ठिकाणी घरे कोसळली, गोठे पडले. जनावरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही अधिक आहे. १८५ जनावरे वीज पडून व पुरात वाहून दगावली. त्यातील ४३ जनावरे लहान होती, तर १४२ मोठी. नुकसानीचे हे आकडे अधिक असले, तरी अजूनही मदतीचा पत्ताच नसल्याने हिंगोली जिल्ह्य़ात रोष व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातही शुक्रवारी जोराचा पाऊस झाला. कन्नड व वैजापूर येथे झालेल्या पावसामुळे शिवना टाकळी हा प्रकल्प पूर्णत: भरला असून शुक्रवारी रात्रीच्या पावसाने काही जणांच्या घरात पाणी घुसले होते. बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्य़ात पिकांचे नुकसान झाले नाही. मात्र नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्य़ांत अधिक नुकसान झाल्याची आकडेवारी सरकारदरबारी आहे.
पावसाळ्यात वीज पडून मराठवाडय़ात ७६ जणांचा मृत्यू
या वेळी पावसाळ्यात तब्बल ७६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारदरबारी आहे. यातील ४५ मृत्यू वीज पडून झाले आहे. २१ जण पुरात वाहून, तर ५ जणांचा मृत्यू दरड कोसळून झाला आहे.
First published on: 13-10-2013 at 01:51 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lightning killed 76 in rainy season